पडवळाच्या फुंकण्या

  • अर्धा किलो पडवळ (कोवळे).
  • पाऊण वाटी चण्याची डाळ (चार तासापूर्वी भिजत घालणे).
  • लसूण ७/८ पाकळ्या, हिरव्या मिरच्या ३/४, चवीला आल्याचा तुकडा.
  • कोथिंबीर बारीक चिरलेली (अर्धी वाटी), अर्धा नारळ किसून.
  • चवीला साखर व मीठ.
  • फोडणीचे साहित्य.
३० मिनिटे
४ जणांसाठी

पुर्वतयारी -
चण्याची डाळ ४ तास आधी भिजत ठेवावी.
पडवळाची साले काढून घ्यावीत (बटाट्याची काढतात तशी)

कृती-
चण्याची डाळ, लसूण पाकळ्या व मिरची/आले मिक्सर मधून मध्यम (एकदम बारीक नको व भरभरीत नको) वाटून घ्यावी. पाणी टाकू नये.
कढईत तेल तापवायला ठेऊन तेल कडकडीत तापल्यावर मोहरी, हिंग, जीरे, हळद, तिखट ह्यांची फोडणी द्यावी.
वाटलेल्या डाळीचा गोळा फोडणीला टाकावा.
डाळ चांगली परतल्यावर वाफेवर शिजवून घ्यावी.
थंड झाल्यावर त्यात हिंग, मीठ, साखर, कोथिंबीर व नारळ घालून एकजीव करावा.
पुरण तयार झाले.

पडवळाचे बोटभर लांबीचे तुकडे करून आतल्या बिया काढून टाकाव्यात. पोकळ फुंकणीत पुरण दाबुन गच्च भरावे.
फ्राय पॅनमध्ये पुन्हा फोडणी तयार करावी व भरलेले पडवळ त्यात फोडणीला सोडावे. वर झाकण ठेवून त्यावर पाणी टाकावे व वाफेवर शिजवावे. 
अधून मधून झाकण काढून फुंकण्या फिरवत राहाव्या म्हणजे एका बाजूला लागणार नाहीत.  

ह्या फुंकण्या पोळीबरोबर छान लागतात.

पडवळाच्या बीया कोवळ्या असल्यास कुस्करून पुरणात टाकाव्यात पण जुनाट/ओचट असल्यास वापरू नयेत.

आई.