निमित्तमात्रे.....

...परवा, रविवारी शिवसेनेतून सुमारे तीन ते चार महिन्यांपूर्वी बाहेर पड्लेले युवकांचे लाड्के नेते मा. राज ठाकरे यांनी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' या नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली त्यानिमित्त  महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न.........
    धुळवडीच्या दिवशी नवी मुंबईत माथाडी कामगार व स्थानिक लोकांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसन दंगलीत होउन गेले ४-५ दिवस तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही निरपराध लोकांना आपले प्राण गमवावे लागले. ही बातमी आपणा सर्वांना विविध वृत्तवाहिन्या, तसेच वृत्तपत्रे यांच्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत पोहोचली असेलच. अशा अनेक घडामोडींचे आपणांस या माध्यमातून दर्शन होत असते. पण 'रोज मरे त्याला कोण रडे? अहो कोणाला वेळ आहे या भानगडींकडे लक्ष द्यायला?' आणि मग असे असताना ही घटना मी पुन्हा आपल्यापुढे मांडायचे कारण काय? तर मित्रहो, यामागे एकच नव्हे तर अनेक कारणे आहेत आणि या कारणमीमांसेद्वारे आजवर आपल्यापुढे आल्या नसतील अशा काही गोष्टींचा आपण वेध घेउयात.
आधी आपण वृत्तपत्रांनी ज्या क्रमाने ही घटना आपणासमोर मांडली तो क्रम पाहू.
१.  धुळवडीच्या दिवशी नवी मुंबईत माथाडी कामगार व स्थानिक लोकांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसन दंगलीत होउन दोन गटांत तुफ़ान दगड्फ़ेक. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन ठार, माथाडींचे नेते नरेंद्र पाटील गंभीर जखमी, त्यांचा अंगरक्षक जागीच ठार. संतप्त जमावाकडून वाहनांची जाळपोळ.
त्यानंतर सलग तीन दिवस  दगड्फ़ेकीचे प्रकार सुरुच.
२. माथाडी कामगारांचे नेते आ. शशिकांत शिंदे यांची विधानसभेत 'सदर घट्नेस पोलिसच जबाबदार असून, याची राज्य गुप्तचर यंत्रणेमार्फ़त चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कारवाई करून माथाडींना न्याय द्यावा ' अशी मागणी.
३. 'कायदा व सुव्यवस्था' राखण्यासाठी पोलिसांनी शस्त्रे हाती घेण्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांचं आवाहन.
४. आर. आर. हे आतापर्यंतचे सर्वात दुबळे गृहमंत्री- भा. ज. पा. नेते गोपीनाथ मुंडे यांची टीका.मुंडेंच्या प्रशस्तिपत्राची मला गरज नाही, मला प्रशस्तिपत्र द्यायला ते कोणी कुलगुरु नाहीत- आर. आर. यांचा मुंडेना टोला.
आता यात कोणी काय गमावले, व कोणी काय 'कमावले' ते पहा.
काही निरपराध व्यक्तींच्या प्राणांच्या बदल्यात काय तर, चौकश्या, समर्थने,टीका... आणि पुन्हा या ना कारणाने ठरावीक तीच ती नावे चर्चेत. त्या मेलेल्या लोकांची नावे किती जणांस ठाउक आहेत? आणि जरी ठाउक असली तरी किती काळ आपल्या लक्षात राहणार आहेत? आज आपल्या अभिनयकौशल्याने अजरामर झालेल्या अनेक कलाकारांची नावे आपण लगेचच सांगू शकतो, पण देशासाठी सीमेवर लढताना हौतात्म्य पत्करलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील त्या  अनेक असामान्य वीरांची नावे आपण सांगू शकू? नाही... कारण सर्वस्वाची आहुती देउनहि त्यांना लाभले नाही ते, 'प्रसिद्धिचे वलय'  जे या कलाकारांना आपण सहजपणे बहाल केले. नेमकी हीच परिस्थिती आजच्या 'या' समस्त राजकीय नेतृत्वाची आहे. राज्यव्यवस्थेचा मुलभूत, पायाभूत घटक समजून लोकशाहीचे मंदिर उभे करण्यासाठी पायात गाडून घेतो तो आपला सर्वसामान्य नागरिक आणि मग त्यावर आपल्या 'या' लोकशाहीतील चढत्या क्रमाने आपल्या कर्तृत्वाने 'कळस' चढविणारी ग्रामपंचायत सदस्य ते मुख्यमंत्री अशी ही 'गोपुरे' आणि मग या सर्वांचा करताकरविता असा 'तो' जेव्हा कलशस्थानावर आरुढ होतो तेव्हा उभे राहते हे लोकशाहीचे 'पवित्र' मंदिर.  मग 'त्या' पायाच्या नशिबी येतो आजन्म अज्ञातवास...शिवछत्रपतींचा आपापल्या परीने आणि सोयीने वारसा सांगणाऱ्यांसाठी मुद्दाम हा प्रसंग मांडत आहे.
शिवछत्रपती जेव्हा दिल्लीस औरंगजेबाच्या भेटीस गेले, तेव्हा रामसिंग महाराजांना शंभूराज्यांसह ताजमहाल दाखविण्यासाठी घेउन गेला. तेव्हा स्वप्नवत वाटावे असे ते सौंदर्यसंपन्न संगमरवरी शिल्प पाहून छत्रपती सुखावले; पण क्षणभरात त्यांची मुद्रा गंभीर झाली. त्यावर रामसिंगाने विचारले असता महाराज उत्तरले, " रामसिंग, आपणास या वास्तुकडे पाहिले असता त्याच्या सौंदर्याची, अद्वियतेची जाणीव होते, पण आम्ही जेव्हा या वास्तुकडे पाहिले तेव्हा आमच्या मनात एक वेगळी वेदना उमटली. आजवर अनेकांनी या वास्तुस भेट दिली असेल, त्याच्या संगमरवरी सौंदर्याची तारीफ़ही केली असेल; पण या वास्तुचा पाया म्हणून ज्यांनी स्वतःला गाडुन घेतले, त्या काळ्या फतरांची कधी कोणी तारीफ़ केलेली आपण ऐकली आहे ? आम्ही जेव्हा या वास्तुकडे पाहतो तेव्हा स्वराज्याच्या उभारणीवेळी आम्हास ज्यांचे मोल द्यावे लागले (बाजीप्रभू,मुरारबाजी,रामजी पांगेरा........)अशांची आठवण येते. ती जाण जरी या तथाकथित अनुयायांमध्ये असती तर आज हया विषयावर एवढी उहापोह करण्याचे प्रयोजन नव्हते. सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी एका व्यक्तीच्या ध्यासातुन स्वतंत्र राज्याची संकल्पना पुढे येते, 'स्वराज्य' या एका विचाराला हजारो मनांत स्थान मिळते, आणि मग त्या संकल्पनेचे रुपान्तर संकल्पात होउन, तो संकल्प तडीस नेण्यास त्याग, बलिदाने यांचा पाया रचून यवनांच्या जुलमी राजवटीत नागवल्या गेलेल्या दीनदुबळ्या रयतेच्या हजारो हातांनी त्या ध्येयवेड्या राजयोग्यास बळ दिले. आणि मग सुरु झाला एक महासंग्राम! प्रस्थापितांचे वर्चस्व झुगारून अपुऱ्या साधनांनिशी मूठ्भर लोकांना हाताशी घेउन अनेक वादळांचा सामना करून स्वराज्याची मशाल पेटती ठेवली. त्यानंतर या स्वऱाज्यामध्ये अनेक जातीधर्मांचे लोक आनंदाने एकत्रित नांदु लागले. हे सारे केवळ एका व्यक्तीने मोजक्याच लोकांच्या सहाय्याने सहज शक्य करून दाखविले, मग आपण आज अत्याधुनिक सेवासाधनांसह, हजारो नेतृत्वांच्या झेंड्यांखाली दिमतीला लाखो कार्य्कर्त्यांची फ़ौज घेउनही त्यांनी आपणास लढून, झगडून मिळवून दिलेले हे राज्य सुरळितपणे चालवू शकत नाही, हे आपले कपाळकरंटेपणच नव्हे काय? अहो, आज किमान दहा कार्यकर्त्यांमागे एक नेता हा असतोच, मग असे का? आज हिंदू, मुस्लिम, दलित अशा अनेक जाती- पोटजातींच्या तुकड्यांत महाराष्ट्र विखुरलेला आहे. आणि या प्रत्येक समाजाला त्यांच्या प्रश्नांची जाण असलेले, त्यांच्या समस्या सोडविण्यास सदैव तत्पर असणारे स्वतंत्र नेतेही लाभलेले आहेत. पण यातील कोणता एक घटक तरी समाधानी आहे का? जर हिंदूंचे पुढारी सक्षम आहेत तर मग वरील घट्नेप्रमाणे इतर अनेक घट्नांचे ते बळी का ठरावेत? जर दलितांचे पुढारी सक्षम आहेत तर मग जातीच्या अनुशेषाने मिळणाऱ्या सोयी- सवलतीच्या आधारे शिक्षणाने समृद्ध होउन का झोपड्पट्टीतुन बाहेर येउन ही बालके उच्चभ्रू समाजात स्थानापन्न होउ शकत नाहीत? का दोनवेळच्या अन्नासाठी टाहो फोडून, ती झोपड्पट्ट्यांमध्येच आपले मरण हुडकत फिरताहेत? आणि नेमक्या याचवेळी त्यांच्या वेदनांची जाण असलेलं त्यांचे नेते कुठायत? झोपड्यात? तसेच मुस्लिमसमाजाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांचे स्वतःचे असे नेतृत्व नसून या इतर दोन प्रवाहांपैकी कोणत्या प्रवाहात सामील व्हावे या संभ्रमात ते सापलेले दिसतात. ही कोणावरही टीका नसून वस्तुस्थिती आहे. यामागची एकच तळमळ आहे, साडेतीनशे वर्षांपूर्वी आपले पूर्वज एकछत्री अमलाखाली सुखी होते, मग आज आपल्या (डोंबला)वर एवढ्या पुढाऱ्यांचे (फाट्के) छत्र असूनही आपण सुखी आहोत का? नाही. का तर त्या जाणत्या राजाने आखुन दिलेल्या राजमार्गावरुन न नेता हे नेते आपणास भलत्याच पायवाटेने घेउन चाललेले दिसतात. अशाप्रकारे आज नेता, त्याचे नेतृत्व या गोष्टींना प्रतिकूल परिस्थिती असताना राज ठाकरे यांचा सर्वसामावेशक
'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' या नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय धाडसाचा वाट्तो. कारण या सर्वांनी गमावलेला जनतेचा विश्वास जिंकणे हेच राज यांच्यापुढील सर्वात खडतर आव्हान आहे. तरी त्यांच्या पक्षाची एकंदरीत ध्येयधोरणे, तसेच शिवतीर्थावर लोटलेला विराट जनसमुदाय पाहता, दोन गोष्टी समोर येतात, ते म्हणजे माणसाने आशावादी राहण्यास हरकत नाही आणि नुसत्या घोषणेवरच न थांबता राज यांनी कामाला लागावे. आगामी काळातील त्यांचे कार्यच त्यांना जनाधाराचे 'प्रसिद्धिचे वलय'  आपोआपच लाभेल यात त्यांनी शंका बाळगू नये.
वाचकांनी आपले अभिप्राय जरूर पाठवावेत.