काळा काळा बागूलबुवा
रडलं म्हणजे येतो म्हणे
मी रडले असता मग तो
येत का नाही, कोण जाणे !
जेवले नाही की तू म्हणतेस,
'घास घेऊन जाते चिऊताई'
मी ताट भिरकवून सुद्धा
मग का ती येत नाही ?
झोपले नाही की तू म्हणतेस,
'येतो बरं लबाड कोल्हा'
दार उघडून बघते मी
मग का तो नसतो तेव्हा ?
खोटं खोटं बोलून तू
जेव्हा तेव्हा मला फसवतेस
मी खोटं बोलले म्हणजे
मग का 'खरं बोल' म्हणतेस ?