शून्य (गूढ कथा)

शून्य  (गूढ कथा)


( या कथेतील सर्व पात्रे व प्रसंग हे काल्पनिक असून प्रत्यक्षातील कुठल्याही व्यक्ती वा प्रसंगाशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. )


प्रेरणाबाईंनी गाडी पार्क केली आणि एकवार घडाळ्यावर नजर टाकली. ठरल्या वेळेत येणे झालेले पाहून त्या क्षणभर विसावल्या. कुणी बघत तर नाही ना याची खात्री करुन त्या इमारतीमध्ये शिरल्या.डॉ. सुधाकर देशपांडे म्हणजे एक नामवंत मानसोपचार तज्ञ. पाटी वाचून त्या आतमध्ये शिरल्या.


 ' नमस्कार डॉक्टर'


'नमस्कार !' लग्नाला निघाल्यासारखी तयारी आणि चेहऱ्यावर ताण हे असे व्यक्तिमत्व पाहून जरा गोंधळात पडलेल्या डॉक्टरांनी विचारले, ' आ..पले नाव ?'


' मी मिसेस प्रेरणा गोंधळेकर !'


'बरोब्बर !' डॉक्टर.


'काय बरोबर आहे डॉक्टर ?'


' अं ? काही नाही ! बसा आपण.  हं बोला आता.'


'डॉक्टर, कळतच नाही कुठून सुरुवात करु . '


' अहो कुठूनही करा. नाही तरी आमच्याकडे येणाऱ्या लोकांचे बोलणे ऐकले की शेवटी कळते की जिथे सुरुवात केली तो खरे तर शेवट होता. पण आता सवय झाली आहे. त्यामुळे मी एडिटींग शेवटीच करतो. तुम्ही बोला ! ' 


' पण डॉक्टर मी माझ्यासाठी आलेली नाहीये, माझ्या मुलीसाठी आलेली आहे.'


' ओहो! सॉरी ! आता थोडी कौंटुंबिक माहिती सांगा  !'


' तर डॉक्टर, प्रतिभा ही आमची लाडकी मुलगी. फुलासारखी जपली आहे आम्ही तिला. फार लाडाकोडात वाढवली आहे तिला आम्ही.'


आता कुणाला आपले मूल लाडके वाटत नाही. पण बाईंचे बोलणे एकंदरीतच अघळपघळ.


'अरे वा! छानच आहेत हो तुमची नावे. प्रेरणा काय, प्रतिभा काय ?'


' हो ना डॉक्टर, अहो त्याचीही गंमतच आहे. मला चार मोठे भाऊच. पण त्या काळी मुलींची होणारी भ्रुणहत्या यावर लेख वाचून माझ्या वडिलांनी प्रेरणा घेतली आणि माझा जन्म झाला'


' अरे वा! खरे की काय ?'


' मग माझे वडील काळाच्या पुढे बघणारे होते.'


' ते ठीक आहे. पण अधून मधून स्वतःच्या परिस्थितीकडेही बघावे माणसाने.'


' काय म्हणालात डॉक्टर ?'


' काही नाही. पेशंट बरोबर राहून थोडी पुटपुटण्याची सवय लागलीय. तुम्ही नका लक्ष देऊ. आणि हे प्रतिभा नाव ?'


' हं! तर ही लहानपणी फार मंजुळ स्वरात रडत असे. तेव्हाच  मला हिच्यात गानप्रतिभा आढळली आणि म्हणून नाव प्रतिभा.'


'वा! फारच छान! आता कुठवर आलेय गाणे शिकणे ?'


' गाणे नाही शिकली पण जिमनॅस्टीक फार छान करते.'


'जिमनॅस्टीक ?? सर्कशीत करियर करणार आहे का ? 


' काही तरी काय हो डॉक्टर ? असते एकेकाला आवड.'


' प्रतिभेचे बाबा काय करतात ? आणि त्यांच काय नाव ?'


' हे इन्कमटॅक्समध्ये आहेत आणि नाव सखाराम !'


'प्रेरणा, प्रतिभानंतर एकदम सखाराम कसे ?'


'अहो, आमच्या सासऱ्यांना थोडी प्यायची सवय होती ...'


' अच्छा म्हणजे त्यांची प्रेरणा सखाराम बाईंडर, करेक्ट ?'


' अय्या किती हुशार आहात हो  डॉक्टर तुम्ही !'


'अहो, त्यात काय एव्हढे ? माझ्याही वडिलांचे नाव सखारामच आणि आजोबांचे तळीराम'


' आणि डॉक्टर  तुमचे सुधाकर, म्हणजे तुमच्याकडे तर परंपराच...'


' बरं ते जाऊ द्या ! काय दुखणं आहे तुमच्या प्रतिभेचं ?'


' अगबाई! बघा आले कशासाठी आणि काय बोलत बसले ? '


'हरकत नाही, इथे आले की होते असे.'


'हं तर प्रतिभा ही आमची लाडकी मुलगी. फुलासारखी जपली आहे आम्ही तिला. फार लाडाकोडात वाढवली आहे तिला आम्ही ( परत तेच!). पण हल्ली एकटी रहाते. अबोल झाली आहे. नखं कुरतडते. शून्यात बघत बसते.'


' अरे बाप रे म्हणजे निम्मी लक्षणे आत्ताच दिसू लागलीत '


' कसली लक्षणे डॉक्टर ?'


' काही नाही, तुम्ही बोला' 


' हल्ली सारखी शून्य-शून्य करते डॉक्टर.'


'शून्य-शून्य करते ? म्हणजे नेमके काय करते ? जरा नीट सांगाल का?'


'म्हणजे शून्यात नजर लावून बसते. भूक कमी झालीय. उदास रहाते. परवा पाहीले तर वॉकमन घेऊन गाणे ऐकत होती. कुठले गाणे विचारले तर म्हणाली,' अर्थशून्य भासे मजला कलह जीवनाचा'. आवडती मालिका विचारली तर सांगते एक शून्य शून्य. एकदा कथा वाचत होती, कुठली पाहिले तर कथेचे नाव 'शून्याची व्यथा '   एव्हढेच नाही डॉक्टर, तिला आपले विचार एका मोठ्या  वहीत लिहायची सवय आहे.  परवा सहज पाहिले तर पुर्ण पानभर गोल गोल काढलेले. डॉक्टर ती नक्कीच शून्य काढलेली होती. आणि परवा तर कहरच झाला. ही रात्री झोपेत बरळत होती.  नाहीसा हो..... माझ्या डोळ्यासमोरुन.... हा कधी...... हटेल..... का.. नाहीसा हो.. शून्य ... शून्य..कधी .... हटेल..... का... शून्य...शून्य... शून्य...' मग मात्र डॉक्टर माझा धीर सुटला आणि मी तडक तुमच्या आले ! 


' अरे बाप रे! ही केस जरा अवघडच दिसतेय. मला एक सांगा हिला परीक्षेत काही अपयश, म्हणजे एखाद्या विषयात शून्य मार्क वैगरे ? '


' काही तरी काय  ? अहो इंजिनिअर आहे माझी मुलगी. जी. आर. ई., टोफेलचे चांगले स्कोअर आहेत तिचे. सध्या अर्ज  करतेय ती अमेरिकेतील विद्यापिठांमध्ये. हुशार आणि क्रिएटीव्ह आहे आमची प्रतिभा नावाप्रमाणे. पण अजून तिला हवी तशी युनिव्हर्सीटी मिळत नाहिये त्यामुळे जरा उदास आहे.'


' मला वाटते प्रेरणाताई, कदाचित हेच कारण असू शकेल. पण खात्री नाही. तुम्ही एक काम करा तिची ती रोजनिशीची वही घेऊन या. त्यातूनच काही माहिती मिळू शकेल.


प्रेरणाबाईंनी घाईघाईने गाडी पार्क केली आणि त्या डॉक्टराच्यापुढे हजर झाल्या.


' डॉक्टर , काही कळले का हो ?' काळजीच्या सुरात प्रेरणाबाईंनी विचारले.


' ऐका प्रेरणाताई....' डॉक्टरांनी सर्व समजावून सांगितले.


'काssय ? डॉक्टर ! असे घडू शकते ?


' हो प्रेरणाताई, हे असेच घडतेय.' 


' कधीपासून चालू आहे हे डॉक्टर ?'


' गेले चार महीने ती जाते आहे तिथे'


'डॉक्टर, चार महीने झाले आणि सतत बाजुला असूनही आम्हाला काहीच माहित नाही ? ,आत्ताच शेजारीपाजारी आणि नातेवाईक हिचे वागणे बघून कुजबुजतात. आणि हे कारण कळले तर ? प्लीज डॉक्टर  कुठे बोलु नका.'


' हे बघा प्रेरणाताई काळजी  करु नका. पुढच्यावेळी तिला येताना घेऊन या बरोबर. मला जरा तिच्याशी बोलु द्या. यातून  नक्किच काही तरी मार्ग निघेल. 


                                                                   ( भाग १ समाप्त )


                                                                   - अभिजित पापळकर