या अबोल कातरवेळी साद कुणाची येई
तू स्पर्शलेस मज अन मग मी माझी उरले नाही !
तो भास रातीचा होता की खरेच तू रे आला
वेड्याच मन-अंगणी मी कसा घेतला झोका
ये फुलून अवघा कण.. कण.. स्मरतो अजून; अजूनही
तू स्पर्शलेस मज अन मग मी माझी उरले नाही !
मन बनू पाहे भिंगरी अन अंतरात भिरभिरते
श्वासात तुला घेऊनी बघ हळूच गिरकी घेते
गंधाळून सारे... सारे.. तन जणू सुगंधी जाई
तू स्पर्शलेस मज अन मग मी माझी उरले नाही !
तू दूरदेशीचा राजस मागावी कुठवर साथ
ही गोडगोजिरी स्वप्ने का फुलती गाभाऱ्यात
ते घडीभराचे सुख रे ! कळते पण उमगत नाही
तू स्पर्शलेस मज अन मग मी माझी उरले नाही !