कोडे - खटल्याचा निकाल

एक कायद्याचं ज्ञान शिकायला अत्यंत उत्सुक मुलगा एका ख्यातनाम कायदेपंडीताकडे गेला. ज्ञानार्जनात मदत करावी अशी विनंती करत त्याबद्दलची फी देण्यास सद्ध्या असमर्थ असलो तरी माझी पहिली केस जिंकताच मी आपली फी देईन, असे म्हणाला. शिक्षक महोदय शिकवायला तयार झाले व शिकवणी पूर्ण झाली. त्या मुलाची फी देण्याची काहीच चिन्हं दिसेनात तेव्हा शिक्षकमहोदयांनी याबद्दल त्याला विचारले, याहीवेळेस त्याने पुर्वीचेच कारण पुढे केले. शिक्षकमहोदय खूप चिडले व त्यांनी त्या मुलाविरूद्ध न्यायालयात दावा दाखल केला. दोघांनीही स्वतःचे म्हणणे स्वतःच मांडण्याचे ठरवले, जे मांडले गेले खालीलप्रमाणे :

शिक्षकमहोदय : जर मी ही केस जिंकलो तर न्यायालयाच्या नियमांनुसार या मुलाला मला फीचे पैसे द्यावे लागतील आणि जर मी ही केस हरलो तर हा मुलगा त्याची पहिली केस जिंकेल आणि त्याच्या आधीच्या म्हणण्यानुसार तो मला फीचे पैसे देणे लागेल. सांप्रत या मुलाला कुठल्याही परिस्थितीत मला माझ्या फीचे पैसे द्यावेच लागतील.

मुलगा : जर मी ही केस हरलो तर माझी पहिली केस हरलेली असल्याने मी या महोदयांना काही पैसे देणे लागणार नाही आणि तेच जर मी ही केस जिंकलो तर न्यायालयाच्या नियमांनुसार मी त्यांना पैसे देणे लागत नाही. सांप्रत मी या महोदयांना कुठल्याही परिस्थितीत पैसे देणे लागत नाही.

या खटल्यावर काही उपाय कोणाला सुचतो आहे का? :D

मलातरी नाही बुवा सुचलेला !