वसंत
कसा अचानक मोहर फ़ुलला
कशी कुठे सुरवात जाहली
कधि न कळले मलाच माझे
असे पाखरु मन हे झाले...
अलगद आला तुझाच हा स्वर
फ़ुंकर मारीत श्वासावरती
स्पर्श तुझा तो बिलगुन गेला
अगणित ऊर्मि उसळत घुसळत...
नजरेला ना नजर ही भिडली
तरिहि तुला मी पाहत होते
काय बोललो स्मरतहि नाहि
फ़क्त तुझा सहवास आठवे...
त्या नादाने स्वप्न पाहिले
अबोल नाती गुंफ़ुन बसले
खेळ खेळता रंगुन गेले
कळी काळाचे भान न उरले....
जिथे तिथे बस तुझाच वावर
देहभान हे विसरविणारा
रितिरिवाजा धुडकावुनिया
तनी मनी मी बहरुन गेले....
फ़क्त एकदा मना स्मरोनी
सांग मला हे का रे घडले
प्राक्तनातले हिशोब फ़ुटके
का वाटेवर विखरत गेले....
वेचुन काचा बांधुन नक्षी
सजविलिस तु माझी स्रुष्टी
स्रुजनाचे तु चित्र रेखिले
माझ्या नेत्री माझ्या गात्री.......
शीला