रितेपणाची सरली जाणीव
रक्तामधुनी हिरवी नेणीव
चमत्कार ती असा करु दे
पुन्हा एकदा मला फुलू दे
निळ्या ढगांची निळसर भाषा
किती जन्मती निळसर आशा
शून्यामधुनी उठती लाटा
त्या लाटांवर स्वार होऊ दे
पुन्हा एकदा...
डोळ्यांमधले खळले पाणी
कंठामधुनी अवखळ गाणी
चैतन्याचा झरा भोवती
हृदयामधुनी तोच वाहू दे
पुन्हा एकदा...
जेथे केवळ प्रेमच राहे
आणि मनातून शांती वाहे
द्वेषाला नच थारा जेथे
अश्या जगास्तव मला झुरू दे
पुन्हा एकदा...