कर्ता..

दुपारचं ऊन चांगलंच तापलं होत. रस्त्यावरचा प्रत्येकजण सावली शोधत होता. गरम झळांनी सर्वांगाची काहीली होत होती व उष्णतेच्या विखारी वणव्यात सगळे भाजून निघत होते. अशा तापलेल्या भर दुपारी राचय्या व त्याचं कुटुंब रस्त्यावर 'कडकलक्ष्मी'चा खेळ करत पैसे मागत चालत होतं. राचाय्याच्या शरीरावर मारलेल्या फटक्यांचा आवाज सगळीकडे घुमत होता. त्याच्या कांबीसारख्या काटक शरीरालाही हे ऊन सहन होत न्हवत व तो घामाने निथळून गेला होता. त्याच्याबरोबर सावली सारखी असणारी नागम्मा कडेवर छोट्या भैरीला सावरत पाय ओढतं चालत होती. आठ वर्षाचा रेण्णा लोकांपुढे हात पसरून पैसे मागत होता. रस्त्यावर वाहनांची व माणसांची वर्दळ कमी झाली. भुकेने कासावीस झालेल्या राचय्याने एका झाडाखाली बस्तान ठोकलं. त्याने पायातले चाळ बाजूला काढून हातातला 'कडकलक्ष्मी'चा पिळटा खाली ठेवला. नागम्माही हाशहुश करत खाली बसली व तिने तिच्या पोतडीतनं खाण्याचं गाठोडं काढलं. खाणं बघताच भुकेलेल्या छोट्या भैरीने भोकांड पसरलं. राचय्याने तिला जवळ घेतलं व तिला तो खाऊ घालू लागला. सकाळपासून चालून चालून रेण्णा ही थकून गेला होता त्याने खाली बसकण मारली व तो आईने दिलेले खाणं चिवडत राहिला.


खाऊन होताच ते सर्वजण तेथेच लवंडले. रेण्णाला झोप येत न्हवती म्हणून तो भैरीशी खेळत बसला. संध्याकाळ होताच त्यांचा 'कडक लक्ष्मीचा' फेरा पुन्हा चालू झाला. रात्री जेव्हा ते त्यांच्या खोपटात आले तेंव्हा आजूबाजूच्या झोपड्यांमध्ये शिवीगाळ व मारझोडीला ऊत आला होता. कोपऱ्या वरचा गुत्ता माणसांनी भरून गेला होता. राचय्याही मधूनच कधीतरी 'पिऊन' येत असे पण त्याने कधी नागम्माला वा मुलांना मारलं न्हवत. आजही त्याने विचार केला की गुत्त्यात पटकन जाऊन यावं का! पण गेले चार-पाच दिवस त्यांना म्हणावे तेवढे पैसे मिळाले न्हवते. पूर्णपणे हातावर पोट असणाऱ्यांना  ही चैन परवडण्यासारखी न्हवती. राचय्याने त्याच्या नेहमीच्या कोपयातल्या जागेवर घोंगडं हांथरल. ही जागा म्हणजे त्याची स्वतः:ची होती, त्याच राज्य त्या जागेवर होत. त्या जागेवर तो कुणालाही बसून देत नसे. एकदा रेण्णा तिथे बसला होता तर त्याला त्याने तिथून हुसकावून लावलं होत. इतक्या वर्षानंतर नागम्मानेही घरातल्या 'कर्त्या'चा त्या जागेवरचा हक्क मान्य केला होता. परीस्तिथीच्या राखे खाली गाडली गेलेली स्व ची जाणीव राचय्याला त्या जागेवर होत असे.


रेण्णाने कोपऱ्यात बसकण मारली. एवढ्याशा खोपटात हालायलाही जागा न्हवती त्यात राचय्याचं घोंगडं व त्यावर राजा सारखा बसलेला तो! रेण्णाला बापाचा फार राग आला. राचय्याच्या डोक्यावर छतावरच्या पत्र्यावर एक मोठी थोरली पाल जात होती. 'पड! पड!' बापाच्या डोक्यावर पाल पडण्याच्या कल्पनेनेही रेण्णाला हसू आवरेना. राचय्या उठला व एका कोपऱ्यात ठेवलेलं वाडगं त्यानं उचललं. ते वाडगं घेऊन तो नागम्माच्या समोर उघड्या पाठीने बसला. नागम्माने त्या वाडग्यातून कसल्यातरी मुळ्या काढल्या व ती पाण्यात उगाळून राचय्याच्या उघड्या पाठीवर हळुवार हाताने ते मलम लावू लागली. त्याचा ऊग्र वास सगळीकडे पसरला. त्या वासाने रेण्णाला तर मळमळून आलं. त्याला ह्या वासाची चीड होती. "कशाला लावायचं हे!" त्याने एकदा रागाने नागम्माला विचारलं होत. "पाठीची आग कमी होण्यासाठी!" हे सांगताना तिचे डोळे ओलावले होते. नागम्माने मागे एकदा हे मलम रेण्णाच्या पाठीवर लावायचा प्रयत्न केला होता तेंव्हा रेण्णाने  रागाने इतकं थैमान घातलं होत की शेवटी राचय्याला मध्ये पडून 'तुझ्या पाठीवर नाही लावणार!" अस परत परत सांगावं लागलं. आता सुद्धा तो राचय्याकडे रागाने बघत असताना खाली लवंडला व अत्यंत थकल्यामुळे क्षणात झोपी गेला. सगळीकडे सामसूम होऊ लागली होती. नागम्माने चिमणी विझवली व काळोखाच्या पांघरुणात तिने डोळे मिटले. मध्यरात्री केव्हातरी तिला जाग आली. छतावर पडलेल्या भोकांच्या जाळीतून चंद्र दिसत होता व चांदणं खोपटात अनाहूतपणे आलं होत. नागम्मा हळूच उठली व राचय्याच्या जवळ जाऊन झोपली.. पहाटे पहाटे केव्हातरी तिचा डोळा लागला.


सकाळ होताच राचय्या नेहमीप्रमाणे लवकर उठला व त्याने नागम्माला उठवायचा प्रयत्न केला पण तिला आज आळसटल्यासारख झालं होत. उठायचा अगदी कंटाळा आला होता, पण दुसरा काहीच उपाय नसल्यामुळे ति उठली व थोड्याच वेळात त्यांचा 'कडक लक्ष्मी' चा दिवस चालू झाला. दुपारच्या जेवणाची वेळ होईस्तोवर त्यांना अगदीच कमी पैसे मिळाले. आज त्यांचं नशीब जोरावर न्हवते. अंगावर फटके मारत जात असताना, राचय्याने रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बघितलं तर एक शेठाणी त्याला बोलवत होती, तिच्या हातातली दहा रुपयांची नोट राचय्याला एवढ्या लांबून ही दिसत होती. रस्ता ओलांडण्यासाठी तो पटकन धावला. त्याच्या डोळ्यासमोर तिचा हात व दहा रुपयाची नोट एवढंच दिसत होत. रस्त्याच्या मध्ये तो अचानक आल्या मुळे मागून येणाया बसच्या चालकाने जोराचा ब्रेक लावला पण तोवर उशीर झाला होता, बसचा पुढचा भाग राचय्याला एवढ्या जोराने लागला की तो धाडकन रस्त्याच्या कडेला फेकला गेला. त्याचं डोकं फुटपाथच्या टोकावर जोरानं आदळलं व रक्ताचा ओहोळ वाहू लागला. क्षणार्धात तिथे रक्ताचे थारोळं झालं. रस्त्याच्या एका बाजूला राचय्याच प्रेत पडलं होत व त्याचा एक हात नोट घेण्यासाठी तसाच उंचावला होता.


नागम्माने राचय्याला रस्ता ओलांडताना पाहील होत. राचय्याला बसने धडक दिलेली तिने बघितली. जीवनाचा एक भाग अचानक संपल्याची जाणीव तिला झाली. तिने पुढे जाणाया रेण्णाचा हात धरला व सावकाश रस्ता ओलांडला. राचय्याच्या जवळ रस्त्यावरच्या माणसांचा घोळका जमला होता त्यांतून वाट काढत ति प्रेता जवळ पोहोचली. तिचा राचय्या तिथे असहाय्य पडला होता. त्याला तसा पडलेलं बघून तिच्या पायातला जोरच संपला. तिने डोकं गच्च पकडलं व चक्कर येऊन ति तिथेच खाली कोसळली.


नागम्माने डोळे उघडले तेंव्हा ति तिच्याच खोपटात होती व तिच्या पायाशी रेण्णा रडव्या तोंडाने बसला होता. रस्त्यावरच्या घोळक्यात त्यांना ओळखणारा कोणीतरी होता व त्यानेच सगळ्यांना घरी आणलं होत. नागम्माला अवती भवती काय चाललं आहे ह्याची जाणीव न्हवती. राचय्याचा मृत्यू झाल्या नंतर ति पूर्ण दोन दिवस तशीच सुन्न बसून होती. तिसऱ्या दिवशी तिला हळूहळू वस्तुस्तिथीची जाणीव होऊ लागली. "पुढे काय!" हा मोठा प्रश्न होता. आता संध्याकाळ होत आली होती तरी नागम्मा तशीच बसून होती. भैरी आईच्या अवती भवतीच होती. राचय्या गेल्यापासून रेण्णा मात्र पूर्ण बदलला होता. त्याच्या वागण्यात एक प्रकारचा ताठर पणा आला होता. तोही कसल्यातरी विचारात गर्क होऊन बसला होता.


अंधार होताच नागम्माने चिमणी लावली व त्या खोपटात मिणमिणता उजेड पसरला. थोड्यावेळातच रेण्णा कसलातरी निश्चय केल्यासारखा उठला. त्याने राचय्याचं घोंगडं उचललं व कोपऱ्यात घातलं. नागम्मा त्याच्या कडेच बघत होती. मग रेण्णाने कोपऱ्यातला वाडगा उचलला व तो उघड्या पाठीने नागम्माच्या समोर बसला. ति भरल्या डोळ्यांनी त्याच्या कोवळ्या पाठीवर मलम लावू लागली. त्याचा उग्र वास सगळीकडे पसरला. रेण्णाला तो जाणवला नाही. आता हाच वास त्याच्या जीवनाचा साथीदार होता, त्याच्या शरीरात व मनात पूर्ण भिनणार होता.


सकाळ होताच रेण्णा लवकर उठला, त्याने नागम्माला उठवलं आणि थोड्यावेळातच ते तिघं घराबाहेर पडले व जगण्याने दिलेली 'फटक्यांची' शिक्षा पचवत रस्त्यावरून चालू लागले...


राहुल