जेव्हा आपण घर सोडतो,
आपल्या मनातला एक धागा
घराच्या दारातच अडकतो
अगदी नकळत..
जेव्हा आपण घर सोडतो,
तेंव्हा, "घरच्या रागाला
प्रेमाची झालर असते", हे मान्य करतो,
अगदी नकळत..
घरातला आमटी-भात खाऊन
कंटाळलेलो असतो,खरं तर,
पण जेव्हा आपण घर सोडतो,
आमटी-भाताला पिझ्झाच्या वरती जागा देतो,
अगदी नकळत..
उंच उंच भरारी घेऊन,
काही कमावून,काही गमावून,
आपण अगदी शिणून जातो,
अडकलेला तो धागा आता आपल्याला जाणवतो,
आपली पावलं पुन्हा आपण घराकडे वळवतो,
अगदी नकळत..