५३. होता दुर्बल एक जीव - बालकवी

५३. होता दुर्बल एक जीव


होता दुर्बल एक जीव अगदी मातीतला केवळ,
कष्टे कष्टत बापुडा निशिदिनी त्या देहभारा धरी;
कोणेका दिवशी विचित्रचि तया निद्रा करी व्याकुळ
देहाची मग शुद्धबुद्धहि पहा नाही तया राहिली.

मृत्यू येऊन घोर घर्घर करी दारी तयाच्या परी,
होता तो धरणे धरून बसला दारी कुणाच्या तरी.
ते कोणी परि कोण? आणि धरणे हे तो कशाचे असे?
त्याचे त्यास न ठाऊके मग अहा अन्या कळावे कसे?

झाले ते धरणे प्रसादन म्हणा,निद्राहि वा ती पुरी;
देहाच्या जड बंधनातुनि सुटे तो जीव अत्यद्भुत
ही वासंतिक सृष्टि पुष्पहृदयी आता तयाला धरी
तोही मंद सुगंध घेत विचरे सानंद विश्वांतरी