शंकर म्हणजेच निसर्ग

            ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन.
  दरवर्षी या दिवशी आपण पर्यावरण या विषयावर बरेच लेख वाचतो, पर्यावरणाच्या गंभीर प्रश्नावर परिषदा भरवल्या जातात. पण एकंदर पाहता `पर्यावरण' या शब्दाशी आपल्यापैकी बहुतेकांचा संबंध शाळा सोडल्यापासूनच संपलेला असतो. २६ जुलै, कॆट्रिना यासारखी संकटे येऊनही `पर्यावरण' या शब्दाने सर्वसामान्य लोकांच्या कपाळावर आठी पडते आणि काय ही कटकट आहे असाच भाव त्यांच्या चेह-यावर तरळतो.पण आश्चर्य म्हणजे आपण भारतीय पर्यावरणाची महती सांगणा-या प्रतीकाला साक्षात देवाचा दर्जा देऊन त्याची मनोभावे करत आलो आहोत. काहीसे नकळत! आपण ओळखले असेलच तो देव म्हणजे महादेव शंकर! गंगाधर, भालचंद्र, नीलकंठ, त्रिनेत्र ही नावे उगीच गंमत म्हणून ठेवलेली नाहीत. त्या प्रत्येकात एक वैश्विक अर्थ दडलाय.
  पाऊस,वादळ, भूकंप, ज्वालामुखी अशा नैसर्गिक संकटांची कारणमीमांसा न करता आल्याने आदिम अवस्थेतील मानवाने या शक्तींना देव मानले. मग त्या त्या देवाची पूजा केल्यास तो देव प्रसन्न होईल या (अंध)श्रद्धेतून कर्मकांडांना सुरूवात झाली.कालौघात विज्ञानामुळॆ (विशेष ज्ञान ते विज्ञान) `काही' नैसर्गिक घटनांची कोडी माणसाला उलगडली. पण प्राचीन परंपरा तशाच टिकून राहिल्या.
 शंकराच्या बाबतीत मात्र थोडा वेगळा प्रकार आहे. पृथ्वीवरील नॆसर्गिक घटकांचे सार्वकालिक असलेले महत्व त्या एकसंध अशा चित्रातून व्यक्त होत असते. एका चित्रातून हजार शब्दांएवढा संदेश देता येतो. हा उगीच ओढून ताणून आणि सोयीस्करपणे इंटरप्रीट करून काढलेला अर्थ आहे असे काहीजणांना वाटेलही. शंकरासंबंधी इतर कथांचे काय? असाही प्रश्न पडेल. यावर आपण पुढे चर्चा करूच.  ३१ मे लाच मुंबईत येऊन थडकलेल्या पावसाचे वर्णन करताना एका वृत्तपत्राने त्याला `रौद्र तांडवाची' उपमा दिली आहे. रुद्र अर्थात शिव. निसर्ग आणि शिव हे काही वेगळे नाहीत. अमरनाथ,भीमाशंकर या सारखी बहुतेक शिवालये  ही दुर्गम पर्वतांच्या कुशीत किंवा घनदाट अरण्यात का वसवली गेली आहेत याचे कारण हेच की मानवाला निसर्गाचे महत्त्व उमगावे. तोही निसर्गाचाच एक घटक आहे याची त्याला जाणीव व्हावी हाच आहे. संहाराची देवता मानला गेलेला शंकर वास्तविक जीवसृष्टीला फळण्याफुलण्यास मदत करणारा निसर्गच कसा आहे हे मी सांगण्याचा यत्न केला आहे.


 इथे मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की हे माझे पूर्णत: वैयक्तिक मत आहे. इथे कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही. पण कुणाच्या पारंपारिक श्रद्धांना धक्का पोचला असेल तर क्षम असावी. आपण सारे `मनोगती' समजूतदार, पुरोगामी विचारांचे असल्याने माझे मत त्यांना आवडेल अशी आशा करतो.
पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निसर्गाचे महत्व सर्वाना कळावे हा यामागील नम्र पण प्रामाणिक प्रयत्न आहे.
मानवाचे पाऊल पृथ्वीवर पडण्यापूर्वीपासूनच भूकंप, ज्वालामुखी, वादळे अशा नैसर्गिक घटनांचे थैमान पृथ्वीवर चालुच होते. त्यामुळे मानवी हस्तक्षेपामुळे संकटे येत आहेत असे मानणे चुकीचे ठरेल या समजूतीला आता धक्का बसत आहे. गेल्या शतकभरातील मानवाच्या हस्तक्षेपामुळे वातावरणाचा समतोल ढासळत चालला आहे हे मानण्यास पुरेशी जागा आहे. (या संदर्भात आज ३ जून च्या मटा मधील निसर्गमित्र हा लेख वाचण्यासारखा आहे.)


शंकराने वर दिलेला भस्मासूर खरंच होता की नाही हे माहित नाही परंतु प्रचंड बुद्धीचे वरदान लाभलेल्या मानवाने भस्मासूर बनण्याची वेळ स्वत:वर आणू नये एवढीच इच्छा.


           शंकर - निसर्गाचेच एक प्रतिकात्मक रूप.



कुठेही घडेल पुन: पुन: `जुलै सव्वीस'
कारण निसर्गाचाच होऊ लागलाय जीव `कासावीस'
हे वृक्षवल्ली,नद्या, वातावरण आणि अवघी सृष्टी,
भव्य असे रूप `शिवाचे' पडते का आपुल्या दृष्टी?


जंगले,तिवराची झुडुपे, वेली अन लता,
याच तर भागीरथाला रोखणा-या `गंगाधराच्या' जटा,
वनांचे आच्छादन करी पूरनियंत्रण, थोपवून भूमीचे क्षरण,
म्हणूनच व्हावे सर्वत्र आता व्यापक असे वनसंवर्धन
.


वातावरणाचे `कवच-कुंडल'
किती पचवेल प्रदूषणाचे `हलाहल'?
मानवाच्या हव्यासाला नसेच जणू अंत,
पृथ्वीच्या रक्षणास तत्पर तरीही हा `नीलकंठ'


Green House effect आणि Global Warming


चराचरांसाठी न ठरो ही शेवटची Warning
कॅटरिनासम उठेल जेव्हा रौद्रभीषण `तांडव',
स्वीकारेल का याची जबाबदारी आजचा मानव?


`सत्यम शिवम सुंदरम' असे हे निसर्गाचे प्रतिक,
वाटोत जरी कुणाला विचार हे नास्तिक,
भालचंद्र, गंगाधर, त्रिनेत्र आणि नीलकंठ,
प्रत्येकाचा अर्थ पहा कसा वैश्विक,
खरी शिवभक्ती म्हणजे निसर्गाचे रक्षण,
समजून घेऊ सृष्टीचे हे सम्यक दर्शन.


(कवितेत सर्व मुद्द्यांना स्पर्श केलेला नाही. उदा. भालचंद्र, डमरू इ.)
यावर चर्चा पुढे सुरू ठेवूया. )


मी सुरू केलेल्या चर्चेमध्ये भाग घेतल्याबद्दल सर्वांचे आभार.


-मंदार