तर उगाच...

बंद मोर्चे आंदोलनांनी
गरगरतं का तुझं डोकं?
रोजच्या चोरया-मारयांनी
पडतात काळजाला भोकं?


तर तुला सांगतो बाबा,
हे सारं सदैव असंच चालणार
एक कुणीतरी बोलणार नि
दहा जणांना गोळ्या घालणार


म्हणून तू फक्त शांतपणे
हातातलं वर्तमानपत्र वाच
जगाची चिंता वगैरे नको,
तर उगाच ! तर उगाच !!


टी. व्ही. वर दाखवली जाणारी
तुला अश्लील वाटतात का गाणी?
सभोवतालची नग्न संस्कॄती
वाटते का कधी लाजिरवाणी?


तर लेका, मला माफ कर पण
डोळे उघडून एकदा समोर बघ
प्रत्येकाला इथे हेच हवंय
यातच खुश आहे सगळं जग


माझं ऎक, हो सामील त्यांच्यात
नि तूही खुशाल नागडा नाच,
सभ्यता, संस्कॄती सगळं सालं
तर उगाच !  तर उगाच !!


भिकारिणीचे उघडे स्तन बघून
खाली जाते का तुझी मान?
रस्त्यावरच्या पोरांच्या रडण्याने
बहिरे होतात का कधी कान?


तर तू शुद्ध मूर्ख आहेस,
तुझा नि त्यांचा काय संबंध?
तू लिहित रहा तुझ्या कविता
चंद्र, तारे, फुलं नि गंध


त्यातही रडू कोसळलंच ना
तर पुसून घे चष्म्याची काच,
डोळे मिटून फेक दोन-चार आणे
तर उगाच...तर उगाच !!!


---------------------- शतानंद.