शेवटची हाक - २

मागच्या वेळेस भेटलेली जबरदस्त नखरे असलेली अर्पिता आज अगदी भारतीय गृहिणीसारखी सामोरी आली होती ! एकदम छान नीटपणे घातलेली सुती साडी, वेणीत गुंफलेले केस, या सर्वाला साजेसा हलकासाच दागिन्यांचा पेहेराव.. एकूणतच एकदम नविन अर्पिता ! आमचा एकदम छान पाहुणचार केला तिने. रितेश चहा पित पित मध्येमध्ये माझ्याकडे रोखून बघत होता, जसं काही नजरेतूनच म्हणत होता,'काय गं? तू सांगितलंस काय आणि ही आहे कशी?' ! माझ्याकडे नजर खाली करण्यावाचून दुसरा काही पर्यायच ठेवला नव्हता अर्पिताने.

अर्पिताचे यजमान ३-४ दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. माझं खरंतर रितेशसोबत गेस्टहाऊस मध्ये राहण्याचं ठरलं होतं, पण अर्पिताने माझ्यामागे लागून तिच्याच घरी राहण्याबद्दल मला आणि रितेशला मनवलं. थोड्यावेळाने रितेश ऑफीसच्या कामानिमित्ताने निघून गेला आणि तो जाताच मी तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. "हे काय? का? कसं?" वगैरे वगैरे.. माझी अधीरता पाहून अर्पिता खळखळून हसायला लागली. तिच्या हसण्यातून मला माझ्या बालपणच्या अर्पिताचंच ते निरागस हसणं आठवलं आणि त्या आठवांनी अगदी रोमांचित करून टाकलं.

"अगं तू आत्ताच तर आली आहेस. सगळं काय एका दमात जाणून घ्यायचं आहे की काय तुला? थोडावेळ जरा आरामात बैस तर खरी. मी जरा १-२ कामं आटोपून घेते.. मग निवांत गप्पा मारूयात.. काय?" असं म्हणून अर्पिता स्वयंपाकघरात निघून गेली. काहीवेळ दिवाणखान्यातच बसून मग मीही तिच्यामागे स्वयंपाकघरात गेले.
"का गं? काय बनवते आहेस?"
"भरली वांगी आणि कचोरी."
"वाह ! सहीच की, पण आत्ता मला अजिबात भूक नाही गं. आत्ताच तर पोटभर नाश्ता केला की !"
"तुला देतंच कोण आहे पण? हे तर मी माझ्या शेजारणीकरता बनवते आहे. संध्या आहे तिचं नाव.. आई बनणार आहे ती काही दिवसांतच. तिसरा महिना चालू आहे तिचा आता. आजकाल तिला चटपटीत खायची खूप इच्छा होते आहे पण मॉर्निंग सिकनेसमुळे तिला स्वयंपाकखोलीतसुद्धा जाता येत नाही. काल असंच बोलताबोलता विषय निघाला तर म्हणत होती की तिला भरली वांगी आणि कचोरी खाण्याची खूप इच्छा होते आहे, म्हणून आज ठरवलं की सरप्राईज देऊन तिला खाऊ घालावं."
मला आणखीन एक धक्का बसला हे ऐकून ! शेजाऱ्यांनी ख्यालीखुशाली विचारण्यालाही आयुष्यातली दखलंदाजी मानणारी मुलगी आज शेजारणीलाच सरप्राईज देऊन काहितरी चटपटीत खाऊ घालू इच्छित होती. माझा अजिबात विश्वासच बसत नव्हता. मी तिच्या कपाळावर हात ठेवून तब्ब्येत ठीक आहे ना? बघत असल्याचं नाटक केलं.
"चल गं.. काय हे? मी बदलले आहे आता."
"ते तर मी बघतेच आहे.. पण हे सगळं कसं काय झालं काहीच कळत नाही आहे."
"ते सगळं मग सांगते तुला. आधी जरा मी संध्याला हे देऊन येते." असं म्हणत अर्पिता दोन्ही जिन्नस घेऊन निघून गेली. थोड्यावेळाने परत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जबरदस्त समाधान आणि आनंद झळकत होता.
"तुझ्या शेजारणीला खूपच आवडलेलं दिसतंय तुझ्या हातची भरली वांगी आणि कचोरीही."
"हो ना ! ती इतकी खुश झाली की मी तुला काय सांगू?! तिचा आनंदी चेहरा पाहूनच माझं पोट भरलं. खरंच.. दुसऱ्यांसाठी काहितरी चांगलं करून त्यांना आनंद देण्यात कित्ती सुख असतं.. पण हे किती उशिरा शिकले मी.." असं म्हणताम्हणता अर्पिताच्या डोळ्यात एक अजबच सुनेपणा पसरला.. शून्यात बघायला लागली होती ती जणू काही.. भूतकाळातल्या कुठल्यातरी गोष्टीत अडकली होती बहुदा.. काही क्षण तिथेच घुटमळल्यासारखी वाटली पण लगेच वर्तमानात येत म्हणाली,"तू बोल की काहितरी तुझ्याबद्दल.. घरात सगळे कसे आहेत?"
"ए आता खूप झालं हं तुझं.. माझ्या सहनशक्तीची सीमा गाठायला लावू नकोस आता तू मला.."
"म्हणजे?" अर्पिताने हसून विचारलं.
"म्हणजे हे की तुझ्या व्यक्तिगत डायरीचं एकेक पान मला वाचायचं आहे. या आधी जेव्हा भेटलो होतो तेव्हा तू अजिबात अशी नव्हतीस.. त्यानंतर असं काय झालं की ज्यामुळे तू इत्तकी बदलून गेलीस?"
"सांगते.... सांगते.... मागच्या वर्षीचीच गोष्ट आहे... 

क्रमशः