परदेशस्थ मराठीजनांना आवाहन

जी.ए.कुलकर्णी यांच्याविषयी मी 'मनोगत' वर केलेल्या लिखाणानंतर आलेले प्रतिसाद आणि व्य. नि. यावरून हा प्रस्ताव मांडत आहे.
एकंदरीत असे दिसते की वाचकांमध्ये जी.एं. नी भारून गेलेले, 'आपण वाचल्या काही कथा पण आपल्याला काही कळाले नाही बुवा' असा अभिप्राय असणारे आणि जी.ए. अजिबात न आवडणारे असे प्रकार आहेत. 'जी.ए. वाचायला आवडेल, पण सुरुवात कुठून करावी हे कळत नाही' असेही काही लोक लिहीतात. इतका मोठा मराठी लेखक, मग तो आंतरराष्ट्रीय पातळीवर का नाही गेला अशीही खंत काही लोकांना वाटते.
तर ज्यांना जी.ए. एक लेखक म्हणून आणि माणूस म्हणून जाणून घ्यावासा वाटतो त्यांच्यासाठी - विशेषतः भारताबाहेरील मराठी लोकांसाठी - हा प्रस्ताव. जी.एं. संबंधी सगळ्या पुस्तकांचा संग्रह करावा. एकट्यानेच असे नाही, पण एकत्रितरीत्या. त्यात जी.एं. ची स्वतःची सगळी पुस्तके, त्यांनी लिहीलेल्या पत्रांचे संग्रह, जी.एं. च्या लिखाणाचे रसग्रहण करणारी पुस्तके - उदाः 'कृष्णचंदन - धनंजय आचार्य, जी.एं. विषयी इतरांनी लिहिलेली पुस्तके, उदाः 'जीए नावाचे स्वप्न - अप्पा परचुरे','जी.ए. - एक पोर्ट्रेट - सुभाष अवचट' यांचा समवेश असावा. काही निमित्ताने लोक एकत्र येत असतील तर तिथे जी.एं. च्या कथांचे वाचन व्हावे ( येथे 'आम्ही मौजमजा करायला एकत्र येत असतो, तिथे असल्या रडक्या गोष्टी वाचायला सांगता होय?' यापलीकडची परिपक्वता अपेक्षित आहे!), आपण ज्या देशात रहाता तिथल्या भाषेत जी.एं. च्या कथांचे अनुवाद करता येतील का हे पहावे, किमान तिथल्या काही साहित्याच्या जाणकारांना आपल्या या साहित्यीकाविषयी माहिती द्यावी.
तुम्हाला काय वाटते?
ता.क.  अशा प्रकारचा प्रस्ताव / प्रयत्न यापूर्वी झाला असल्यास कृपया या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करावे. ज्यांना जी.ए. हा विषयच कंटाळवाणा वाटतो त्यांनीही या प्रस्तावाकडे लक्ष देऊ नये ( ते देणार नाहीतच म्हणा! )
सन्जोप राव