कर्ज - १

हे घरी आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जबरदस्त ताण आणि चिंता दिसत होती. त्यांचा चेहरा बघून माझ्या मनात नाहीनाही ते विचार यायला लागले. घाबऱ्या आवाजात मी विचारलं,"काय झालं? सगळं ठीक तर आहे ना?"
"ह्म.." उतरलेल्या चेहऱ्याने उत्तर मिळालं होतं.
"मग तुम्ही इतके चिंतातूर का दिसत आहात?"
"अम्म.. काही नाही.. असंच.."

दुसऱ्या दिवशी बातमी कळली की ताईंना परत हृदयविकाराचा झटका आला आहे. हा दुसरा झटका होता. हॉस्पिटलमध्ये हलवावं लागलं होतं त्यांना. मी म्हणाले,"तुम्ही जायला पाहिजे."
यावेळेस जेव्हा हे परत आले तेव्हा त्यांचा चेहरा तणावमुक्त होता. मी विचार केला, चला सगळं ठीक झालं वाटतं. विचारल्यावर म्हणाले,"वाचणं मुश्किल आहे. तुला बोलवलं आहे.." ऐकून मला अतीव आश्चर्य वाटलं. त्यांच्या चेहऱ्यावरून तर असं काहीच वाटत नव्हतं. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा तर ताई जवळपास शेवटचे श्वास घेत होत्या. निरागस चेहरा.. जो या वयातही दिव्याच्या उजेडाप्रमाणे झगमगत असायचा, अगदी सुकून गेला होता. खूपच असहाय्य वाटत होत्या त्या. त्यांची ती केविलवाणी परिस्थिती पाहून डोळे भरून आले माझे. माझ्याशी एकांतात बोलायची इच्छा त्यांनी व्यक्त करता सगळेजणं खोलीतून बाहेर निघून गेले. आता त्यांच्याजवळ फक्त मीच होते. खूप कष्टाने त्यांच्या तोंडून शब्द निघत होते,"निक्की, या आयुष्यात माझ्याकडून काही चुका झाल्या असल्यास माफ.. आणि.. ती... ती डायरी.. आकाशच्या हाती अजिबात.. नको.. जाळून.."
"नाही.. ताई.. नाही.. तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत.." मला रडू आवरणं शक्यच नव्हतं.
"अगं वेडी.. रडू नकोस. बाबांची सगळी संपत्ती ... तुझ्या नावावर.. ती स्विकार.. " त्यांचा हात माझ्या डोक्यावर होता.

सगळी दुनिया एकीकडे व्हॅलेंटाईन डेच्या रंगात रंगली होती आणि दुसरीकडे या सगळ्यापासून दूर आपल्या अर्धवट स्वप्नांसोबत त्यांनी माझ्याच मांडीवर प्राण सोडले. दिव्याची ज्योत विझण्यापुर्वी जशी एकदम झळाळून उठते तसाच मृत्यूपुर्वी काही क्षण त्यांचा चेहरा अगदी उजळला होता. जणू काही त्यांचं आयुष्याकडे कुठलंच मागणं उरलं नव्हतं की कशाबद्दल कुठली खंत, राग त्यांच्या मनात उरला नव्हता याचीच साक्ष देत होता.

त्यांनी मला बोलायची थोडाशी जरी संधी दिली असती तरी मी सांगितलं असतं की जे काही माझं आहे.. ते सगळं.. अगदी हेसुध्दा .. तुमचे आहेत..

मी बाहेर आले. यांनी आतुरतेने विचारलं,"काय झालं?"
मी पुन्हा रडायला लागले. बघितलं तर आत्ताही यांच्या चेहऱ्यावर तीच शांतता.. तीच स्थिरता.. तेच समाधान.

ताईंच्या कुटुंबात आता कोणीच उरलेलं नव्हतं. जे कोणी होतो ते आम्हीच होतो. अंत्यसंस्कार कोणी करायचे असं यांनी विचारता,"तुम्हीच करायला हवेत. शेवटी मैत्रिण ना त्या तुमच्या.."

यांच्याशी जेव्हा माझं  लग्न झालं होतं तेव्हा नेहमी मी ताईंना त्यांच्या आसपासच पाहिलं होतं. त्या यांच्याच वयाच्या होत्या. सगळ्यांकडून ऐकलं होतं की त्या यांच्या खूप छान मैत्रिण आहेत म्हणून. श्रीमंत बापाची श्रीमंत लेक. माझ्या सासुरवाडीपासून काही अंतरावरच त्यांचा शानदार बंगला होता. बंगला, मस्त मोठा बगिचा, नोकरचाकर, गाडी वगैरे सगळ्या सुविधांनी सज्ज होता. नंतर माहित झालं की हे दोघंही एकाच कॉलेजमध्ये सोबतसोबतच शिकले होते. पदवी मिळाल्यानंतर यांनी नोकरी पत्करली आणि त्या पुढच्या शिक्षणाच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात निघून गेल्या होत्या.

जसं की सर्वश्रूत आहे.. कुठलीही मुलगी स्वतःच्या नवऱ्यासोबत दुसऱ्या कुठल्या मुलीचं नाव अजिबात सहन करू शकत नाही मग ती नवऱ्याची कितीही चांगली मैत्रिण असली तरीही. मीही काही वेगळी नव्हतेच. माझंही मन अनेक शंकाकुशंकांमध्ये भोवंडत गेलं. या दोघांच्यामध्ये काही लफडं आहे का की खरंच फक्त मैत्री आहे? की आणखीनही काही आहे? असे विचार मला स्वस्थ बसू देईनात.

क्रमशः