इंग्लंड्चा बकवास खेळ

(मेघदुत नी सुरु केलेल्या मालिकेवरुन प्रेरीत होउन आणि इग्लंडचा सपोर्टर असल्यामुळे आजच्या त्यांच्या स्विडन विरुद्धच्या सामन्यानंतर मलाही त्या सामन्याबद्द्ल माझे मत मांडावेसे वाटले.)


आत्ताच इंग्लंडचा स्वीडन विरुद्धचा सामना पाहीला. जे कोल आणि गेरार्ड चे दोन गोल सोडले तर एकंदरीत इंग्लंड अगदीच सुमार खेळले. पुढच्या फ़ेरीत जाताना त्यांच्या खेळाचा दर्जा उंचवायला हवा होता पण तसे काही दिसले नाही. खेळाच्या १ल्याच मिनीटात दुखापतींचा नेहमीचा गिऱ्हाईक ओवेन गुडघा मोडून आडवा झाला आणि तिथेच पाल चुकचुकली. ज्या रूनी-ओवेन जोडगोळीबद्द्ल इतके बोलले गेले ती पहिल्या मिनीटातच संपली. ओवेनच्या जागी पीटर क्राउच ला आणले. तो जरी चांगला खेळत असला तरी त्याच्या डोक्यावर आधीच एक पिवळे कार्ड आहे आणि अजुन एक कार्ड त्याला पुढील सामन्यात खेळू देणार नव्हते. (तीच कथा गेरार्ड ची पण होती त्यामुळे आज त्यां दोघांना ह्या सामन्यात उतरवणार नव्हते पण अखेर ह्या दोघांना मॅदानात उतरावे लागले. इग्लंडचे नशीब चांगले की हे दोघे आज सही सलामत सुटले.)


क्राउच आला तरी इग्लंड गोल साठी झुरतच होते. रुनी आणि लॅम्पार्ड ने बरेच शॉट मारुन पाहिले पण सगळेच फ़ोल गेले. (आज लॅम्पार्डचा वाढदिवस होता. आज गोल मारुन वाढदिवस साजरा करायचा प्रयत्न निश्फ़ळ गेला. त्याचाही गोलचा उपवास आता चांगलाच लांबलाय.) नंतर ३१व्या मिनीटाला अचानक गोलरक्षकाने दुर केलेला बॉल जे कोल ने डी च्या जराश्या बाहेरुन जाळीत मारुन एक अप्रतिम गोल केला (हा गोल नक्किच विश्वचक्षक स्पर्धेतील उत्तम गोलांमधे गणला जाईल).  खेळाच्या उत्तरार्धांत १ - ० अशी आघाडी घेउन जरी  इग्लंड गेले असले तरी त्यांच्या चालींना यश मिळत नव्हते. उलट स्वीडनने ५१ व्या मिनीटात मिळालेल्या कॉर्नरवर एक मस्त गोल केला आणि इग्लंडची आघाडी मोडीत काढली. तशी इग्लंडची नेहमीच एखाद्या गोलची आघाडी डिफ़ेन्ड करायची स्ट्रेटजी राहीली आहे ... मग एखादा गोल खातात आणि सामना स्वतःच्याच गळ्याशी आणतात.


रुनी आणि क्राउच ची जोडगोळी लाही म्हणावे तसे यश मिळत नव्ह्ते. त्याच वेळी फ़र्डिनांड लाही किरकोळ दुखपती साठी बाहेर यावे लागले आणि त्याच्या जागी सोल कॅम्बेल आला. (आज टेरी आणि त्याच्या बचाव फ़ळीला बरेच काम करावे लागले). शेवट्च्या २० मिनीटांसाठी रूनीला काढुन गेरार्ड ला पाचारण केले. त्यानेही आल्या आल्या जे कोलच्या पासवर एक सुंदर गोल केला आणि इग्लंडला ८५व्या मिनीटाला २ - १ अशी आघाडी घेउन दिली.(मला वाटते गेरार्ड ला आता अशा दडपणाखाली खेळायची सवयच झाली आहे... लिव्हरपूल ला आणि इग्लंडला त्याने अनेकदा असे बाहेर काढले आहे. मागच्या वर्षीचा चॅम्पियन्स आणि ह्या वर्षीचा एफ़ ए कप त्याने अक्षरशः खेचुन आणला आहे).


आता फ़क्त ५ (आणि दुखापतीमुळे वाढिव २-३) मिनीटे बचाव करायचा आणि सामना जिंकायचा. पण छे, तसे काही होणार नव्हते. अर्थात अनिश्चितता हाच तर फ़ुटबॉलचा गाभा आहे. कुठल्याही चुकीला इथे माफ़ी नाही.


अगदी शेवटच्या मिनीटाला एका किरकोळ थ्रो-इन वर स्विडनने गोल केला आणि सामना २ - २ असा बरोबरीत सोडवला. अर्थात स्विडनचा खेळ नक्कीच चांगला झाला. त्यांनी जवळ जवळ १३ कॉर्नर जिंकले आणि ३ वेळा त्यांचा बॉल जाळिच्या खांबाला धडकून परत आला. स्विडनच्या ल्युंबर्ग, ऑलबॅक आणि लारसेन ने खुप चांगल्या चाली रचल्या पण आज त्यांचे नशीब इतके चांगले नव्हते.


हे दोन्ही संघ आता पुढच्या फ़ेरीत गेले आहेत. इंग्लंड्ची गाठ आता इक़्वेडर बरोबर तर स्विडनची गाठ यजमान जर्मनी बरोबर आहे.


हया फ़ेरीतुन पुढे जाणे स्विडनसाठी खुपच अवघड आहे. इग्लंडलाही पुढचा सामना जिंकण्यासाठी खेळात बरीच सुधारणा करावी लागेल.


आता ह्या फ़ेरीपासुन विश्वचशकात खरी मजा यायला लागेल.


(टिपः उद्याचा अर्जेन्टिना - हॉलंड सामना मुळीच चुकवू नका. दोन्ही संघ अप्रतिम आहेत, विशेषतः अर्जेन्टिना)