दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी सुदर्शन रंगमंच येथे चित्रकला, शिल्पकला व इतर फाईन आर्टस् यांच्यासंदर्भात एक चित्रपट दाखवला जातो. कधी एखाद्या कलाकारावर तर कधी एखाद्या कलाकृतीवर तर कधी एखाद्या शैलीवर आधारीत हा चित्रपट असतो. चित्रपटाच्या आदल्या शनिवारी याची जाहिरात सकाळ मधे येते. त्याही दिवशी येते.
कधी माहितीपट (डॉक्यूमेंटरी) तर कधी फिचर तर कधी डॉक्यू-ड्रामा असे या चित्रपटांचे स्वरूप असते. आपल्या दृश्य जाणीवा वाढवणारा अतिशय महत्वाचा आणि छान उपक्रम आहे हा. सगळ्यांनी जमेल तसे जात रहावे. तसेच दर ५-६ महिन्यांनी वेगवेगळ्या विषयांना वाह्यलेला एक छोटासा चित्रपट महोत्सवही असतो. गेल्यावर्षी 'नाटकावरील वा नाटक या विषयावरील चित्रपट' असे एक सूत्र होते तर 'राजकारणाशी संबंधित चित्रपट' असेही एक सूत्र होते. दोन्ही महोत्सवात त्या त्या विषयात काम करणारे नवीन तसेच तज्ञ लोकही प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी आले होते.
प्रत्येक वेळेस देणगी प्रवेशिका असते रू. २०/२५. महोत्सवाचे वेगळे. परंतू तुम्ही वर्षाचे एकदम पैसे भरून या उपक्रमाचे सदस्य होऊ शकता. ते काहितरी रू. २०० च्या आसपास असते. या सदस्यत्वामधे दर महिन्यातील एक चित्रपट व वर्षातून २ महोत्सव बघायला मिळतात.
वरील सर्व उपक्रम चालवणारे महत्वाचे दोघे म्हणजे माधुरी पुरंदरे आणि समर नखाते. त्यांच्यासारखे लोक असल्याने आपल्याला जे तिथे मिळेल ते मेंदूसाठी मोठे खाद्य तर असेलच पण आपली समज वाढवणारेही आहे.
या सर्व उपक्रमाची माहिती सुदर्शन येथेच खाली ऑफिस मधे मिळेल.