कधीपासुन कुणास ठाऊक....
पण मागेच असा थांबलोय मी...
नक्की कुठे ते ही नकोस विचारू
मागे जिथे हात सुटले ना..
तिथल्याच मृद्गंधात रमलोय मी...
'काळ' माझ्यासाठीही नव्हताच थांबला,
शरीरात मी ठेवलेच आहेत,
'आज', 'उद्या' साठवत...
वाटेत जिथे साथ सुटली ना..
मनाने मी तिथेच आहे,
साथ असतानाची गाणी आठवत....
(घसरुन जावं असे बरेच काही पडलंय रस्त्यात...
विसरुन जावे असे बरेच काही घडलंय आपल्यात...)
आपलीशी वाटणारी संकेतस्थळं..
छोटे मोठे प्रवास,
रिमझिम पाऊस,
हिरव्यागार पर्वतरांगा..
बोलता येणारे आपण गुपचूप,
अन्..
वाणी नसणारयांचा अविरत दंगा...
''तुझा आवडता पाऊस..
तुझी आवडती हवा..
तुझा आवडता निसर्ग..
अन्
माझी आवडती तू.....''
तू गेलीस ना..
तेंव्हापासून मी यांच्यातच रमतो..
तू येणार नाहीस हे यांना
यांच्याच भाषेत सांगतो...
हिरमुसून जातात बिचारे..
''माझा आवडता पाऊस..
मझी आवडती हवा..
माझा आवडता निसर्ग..
अन्
तुझा आवडता मी.....''
तसा जगून घेतलाय वसंत आपण,
आपाअपल्या परीनं..
त्याच्या खूणाही आहेतच ना
खोलवर जगोजाग...
श्रावण झाला....
वसंत झाला....
आता वैशाखवणावाही असायचाच ना
त्यांच्याही मागोमाग...
मग...
अगं, मग काय...
"उष्ण उष्ण हवा...
धरेला विसरलेला पाऊस...
ऋतुला विकला गेलेला निसर्ग...
आणि एकमेकांची ओळखही विसरलेले आपण..."