या मेघांनो....
या मेघांनो या गगनावर
गर्जत बरसा वसुंधरेवर
चिंब होऊ दे तृषार्त धरती
भिजू दे पाने भिजू दे पक्षी
वर्षा आता तृणांकुरावर
या मेघांनो या गगनावर
लालगुलाबी रंग विखुरती
मेघांची आकाशी नक्षी
इंद्रधनू खुलू दे क्षितीजावर
या मेघांनो या गगनावर
खळाळती निर्झरहि हसती
वृक्षलता हर्षाने न्हाती
रिमझिम हिरव्या मखमालीवर
या मेघांनो या गगनावर
जलधारा करि मंजुळ गायन
मयुर करि अद्वितीय नर्तन
पडो मोहिनी आसमंतावर
या मेघांनो या गगनावर