हरवलेलेसे काही - भाग १

"पीहू.. अगं ए पीहू.." पेपर वाचतावाचता नीलने मारलेली ही तिसरी हाक ! काम सोडून काय म्हणतोय ते बघायला जावंच लागलं.
"काय रे काय झालं? काय आरडाओरडा लावला आहेस?"
नील अगदी उत्साहात म्हणाला,"अहो राणीसाहेब, तुमच्याच आवडीची गोष्ट आहे. गावात एका मोठ्या चित्रकाराच्या चित्रांचं प्रदर्शन लागलं आहे. चलणार का बघायला?"
"वाह ! का नाही? यात विचारायचं ते काय? आजच जाऊयात. अरे पण त्या चित्रकाराचं नाव तर समजू देत की मला.."
"समीर ठाकूर. बरं ए ऐक. आज संध्याकाळी मी लवकर येतो, तू तयार राहशील. काय?"
"समीर ठाकूर.. समीर... !" मी परत नाव उच्चारलेलं पाहून नील म्हणाला,"का गं काय झालं?"
"काही नाही.. नील, मी नाही येऊ शकणार आज. आत्ताच आठवलं की मला मिसेस शर्मांबरोबर शॉपिंग करायला जायचं आहे ते."
"ह्म्म.. ठीक आहे मग उद्या जाऊया."
घाईघाईने मी,"नाही.. माझ्या म्हणण्याचा अर्थ होता की तू का माझ्यासाठी कॅन्सल करतोस? तू जाऊन ये की.."
"जशी आपली आज्ञा राणीसाहेब. मी एकटाच जाऊन येईन."
नील ऑफीसला निघून जाताच मी पेपर उचलला.
"समीर ठाकूरचं चित्रप्रदर्शन.. समीर.. माझ्या समीर.. शेवटी तू माझं स्वप्न सत्य करून दाखवलंसच.." पेपरमधल्या त्या बातमीने माझं मन भूतकाळातल्या प्रसंगांमध्ये वावरायला लागलं.

तेव्हा मी एम.कॉम. च्या पहिल्या वर्षात होते. माझा सिनियर असलेला समीर ठाकूर - खूपच आकर्षक व्यक्तिमत्व, उंचेला आणि एकदम हसऱ्या स्वभावाचा. माझ्या वर्गातल्या इतर मुलींप्रमाणेच मलाही तो खूप आवडायचा पण तो मात्र  कधीच आमच्याकडे लक्ष द्यायचा नाही. मला पक्कं आठवतं, तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये कला-स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. मी पांढऱ्या रंगाचा सलवारकमीज घालून गेले होते. मी त्याच्यासमोरून थोडीशी पुढे गेले होते की तेव्हाच त्याने मला हाक मारली होती,"हेऽऽ पांढरा ड्रेस.. !" मी थांबले. समीर माझ्याचकडे येत होता. याला माझ्याशी काय बोलायचं आहे आता? या विचारासरशी मी घाबरले. तो माझ्याजवळ येऊन म्हणाला,"तू जुनियर आहेस ना?" मी थरथरत,"हो सर.."
"काय नाव आहे तुझं?"
"पीहू गुप्ता.."
"पीहू.. चांगलं नाव आहे. पीहू, थोड्याचवेळात चित्रकला स्पर्धा आहे. तू लवकर तिकडे ये. आज मी तुझंच चित्र काढतो. ठीक आहे?"
मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं,"अम्म? अम्म.. हो सर !"
समीर निघून गेला आणि मी अवाक् होऊन त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहत राहिले. समीरने माझं खूपच सुंदर पोर्ट्रेट बनवलं. मी त्याच्या या रुपाला पाहून विस्मित झाले होते. काही वेळाने जेव्हा कवितांची स्पर्धा सुरू झाली तेव्हा त्यात समीरचं नाव घेतलं गेल्याने मला परत आश्चर्य वाटलं. तो माझ्याजवळून जायला लागला तर मी त्याला हळूच विचारलं,"पोर्टेट तर माझं बनवलंत, आता कविता कोणावर लिहिली आहे?"
त्याने हसून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला,"तिच्याचवर.. जिचं पोर्टेट बनवलं आहे." हसल्याने त्याच्या गालावर पडलेल्या खळीत मी स्वतःला विसरतेय की काय असा भास मला झाला. हळूहळू गप्पा होतहोत आमची ओळख वाढत चालली होती.

आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो आमचं आम्हालाच कळलं नाही, पण हे अजून ना त्याने माझ्यापाशी कबूल केलं होतं ना मी त्याच्यापाशी. बघताबघता एक वर्ष निघून गेलं. त्याचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि मी जुनियरची सिनियर झाले होते. एकीकडे त्याचे नोकरी शोधायचे प्रयत्न सुरू झालेले आणि दुसरीकडे माझ्यासाठी घरी स्थळं बघणं सुरू झालेलं. मी समीरशिवाय दुसऱ्या कोणाचा माझ्या आयुष्यात विचारसुद्धा करू शकत नव्हते. मी समीरशी याबद्दल बोलू इच्छित होते पण त्याचा एकूणच सगळ्या गोष्टी अगदी हलकेच घेण्याच्या स्वभावामुळे मी त्याला काहीच बोलू शकत नव्हते. मी त्याला किती समजावलं की त्याच्या या हलगर्जीपणामुळे त्याला एखाद्या दिवशी खूप नुकसान नको व्हायला, पण तो माझी कुठलीच गोष्ट सिरीयसली घ्यायचा नाही. हसून टाळायचा.

एके दिवशी असंच एक कुटुंब मला बघायला येणार होतं. मी कॉलेजमधून निघालेच होते की समीर दिसला,"इतक्या लवकर कुठे निघालीस पीहू?"
"आज एक कुटुंब मला बघायला येणार आहे."
"असले फालतू विनोद करत जाऊ नकोस पीहू. मला अजिबात आवडत नाहीत."
"विनोद? विनोद तर तू करतोयस समीर.. मी नाही !"
तो एकदम भंजाळून म्हणाला,"तू दुसऱ्या कोणाशी लग्न नाही करू शकत पीहू !"
मला जसं काही काहीच माहिती नाही असा आव आणत मी म्हणाले,"म्हणजे? मी दुसऱ्या कोणाशी लग्न करू शकत नाही म्हणजे काय?"
"पीहू, तुला तर माहिती आहे की मी तुझ्या... तुझ्याशी.."
"माझ्याशी.. काय समीर?"
समीरने एक मोठा श्वास घेतला, डोळे बंद केले आणि घाईघाईत म्हणाला,"मी तुझ्यावर प्रेम करतो पीहू. तुझ्याशी लग्न करू इच्छितो. करशील का माझ्याशी लग्न?" इतकं बोलून त्याने डोळे उघडले आणि मी हसते आहेसं पाहून सुटकेचा श्वास घेतला. हिला सगळं माहिती होतं तरीही.. मग रागावून म्हणाला," सगळं जर तुला माहिती होतं तर मग असं काहीच माहिती नसल्यासारखं का भासवत होतीस?"
"सगळं माहिती होतं मला पण तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. आता चल माझ्या घरी माझ्या आईबाबांशी बोलायला.

क्रमशः