हरवलेलेसे काही - भाग २

समीर माझा हात आपल्या हातात घेऊन म्हणाला,"येईन.. नक्की येईन, पण त्या दिवशी ज्या दिवशी मी काहितरी बनेन. माझ्या पायावर उभा असेन. प्लिज पीहू, मला थोडास्सा वेळ दे."
मलाही त्याचं बोलणं पटलं त्यामुळे मी होकार दिला. या गोष्टीला सहा महिने होऊन गेले पण त्याला नोकरी मिळाली नाही. मग एके दिवशी मी त्याला म्हणाले,"समीर, तू इतका सुंदर कवी आहेस, चित्रकार आहेस, मग त्यालाच तू स्वतःचा व्यवसाय का नाही बनवत? नोकरी शोधण्यासाठी का धक्के खात फिरतो आहेस?"
यावर तो हसून म्हणाला,"मलाही तेच हवं होतं पीहू पण आईबाबांचं स्वप्न आहे की मीही माझ्या दादाप्रमाणे नोकरी करावी. त्यांच्या मते कला संतुष्ट करते पण पोट नाही भरू शकत."
मी त्याला असहमती दर्शवत,"इतकं तर मला काही माहिती नाही समीर पण तुला एका छान चित्रकाराच्या रुपात बघायला मला जास्त आवडेल. तुझ्या चित्रांचं प्रदर्शन लागेल, लोकं ते बघायला येतील, तुझं तोंडभरून कौतुक करतील, एका कलाकाराच्या रुपात सगळे तुला ओळखतील.. हेच तर माझं स्वप्न आहे समीर.."
"आणखी थोडे दिवस जर मला नोकरी मिळाली नाही ना पीहू तर तुझं हे स्वप्न मी खरं करून दाखवीन." तो म्हणाला होता.

त्यानंतर काही काळातच समीरला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. स्वतःच्या कामात गुंग झालेल्या समीरला आता माझ्यासाठी खूपच कमी वेळ देता येत होता पण त्याचं स्वप्न पूर्ण होताना पाहून मला खूप आनंद होत होता. कसं कोण जाणे पण तेव्हाच माझ्या घरच्यांना आमच्याबद्दल समजलं. आई म्हणाली,"काही विचार केला आहेस? तू जर दुसऱ्या जातीतल्या मुलाशी लग्न केलंस तर काय होईल याचा? आणि समज आम्ही जरी हो म्हणालो तरी त्याच्या घरातले याला हो म्हणतील का?"
मी शांत स्वरात म्हणाले,"आई, तू अजिबात चिंता करू नकोस. जर तो माझ्यावर खरंच प्रेम करत असेल तर तो फक्त त्याच्या घरच्यांनाच मनवून थांबणार नाही तर स्वतः येऊन तुमच्याकडून माझा हात मागायला येईल. मला त्याच्यावर विश्वास आहे आई.."
"..पण असं नाही झालं तर..?"
"जर सगळ्या रीतीभाती संभाळत तो मला घेऊन जायला आला नाही तर तुम्ही जे म्हणाल तेच मी करेन."
"ठीक आहे पीहू.. जसं तुला योग्य वाटेल तसंच. आम्हाला तर फक्त तुझा आनंद हवा आहे."

जेव्हा मी हे सगळं समीरला सांगितलं तेव्हा तो म्हणाला,"मी इतक्यातच माझ्या घरच्यांना याबद्दल नाही सांगू शकत पीहू. अजून तर माझा या नोकरीत चांगला जम देखिल बसलेला नाही. थोडी आणखीन मुदत दे मला पीहू.."
मी चिडून म्हणाले,"वेळच तर नाहीये माझ्याकडे समीर. आतातर माझं शिक्षणदेखिल पूर्ण झालं आहे. आता मी काय सांगू माझ्या घरच्यांना आणि थांबा म्हणू? आणि मग माझी लहान बहिण रियापण तर आहे.."
विषय टाळत तो म्हणाला,"बरं ते राहू दे, मला कामानिमित्ताने सिंगापोरला जायचं आहे."
"समीर, तू जायच्या आधी माझ्या घरच्यांशी बोलून जाशील ना?"
"नक्की सांगू शकत नाही पण प्रयत्न जरूर करेन."
"ठीक आहे. तू हवं तर आताच नको येऊस माझ्या घरच्यांना सांगायला, पण जायच्या आधी तुला तुझ्या घरच्यांना तरी आपल्याबद्दल सांगावंच लागेल. तसं झालं की मी आईबाबांना विश्वासाने सांगू शकेन की मी तू परत येईतो थांबणार आहे म्हणून. बोल ना.. सांगशील ना आईबाबांना आपल्याबद्दल?"
काही वेळ अगदी शांत बसून मग तो म्हणाला,"ठीक आहे. बोलेन मी.."

सिंगापुरला जायच्या आधी तो मला भेटायला आला.
"समीर, तू बोललास घरी?"
"ह्म्म्म पीहू.. बोललो मी.. पण माझं बोलणं ऐकताच आईबाबा खूपच चिडले. खूपच ओरडले मला. ते या गोष्टीला तयार होत नाहीयेत पीहू.."
समीरचं हे बोलणं ऐकून डोळ्यासमोर काजवे चमकले माझ्या. त्याचा हात धरून मी म्हणाले,"आता काय होईल रे समीर? आता काय करायचं आपण?"
"अजून काही विचार नाही केला की काय करेन ! पण पीहू मी आईबाबांच्या विरुद्ध नाही जाऊ इच्छित आणि ते हो म्हणण्याची काहीच शक्यता दिसत नाही."
"समीर?"
त्याचा खाली गेलेला चेहरा वरती केला तर त्याने नजर चुकवली. त्यावेळेस वाटलं की सगळं संपलं. माझ्या पायातले त्राणच गेले जणू आणि मी मटकन खाली बसले. समीर काहीच न बोलता निघून गेला.ज्या समीरच्या भरवशावर मी माझ्या घरी इतकी मोठी हमी भरली होती, आज तोच समीर स्वतःची शपथ, माझा भरोसा सगळ्याला तोडून निघून गेला होता.

मी माझ्या घरच्यांशी नजरेला नजर भिडवू शकत नव्हते. माझ्या मनात जे वादळ उठलं होतं त्याला कसं सामोरं जायचं माझं मलाच कळत नव्हतं. किती प्रेम, तक्रारी, प्रश्न माझ्या मनात उभे राहिले होते त्याला तर काही गणतीच नव्हती. माझ्या डोळ्यात कितीक आसवं येऊन उभी होती पण मी मनमोकळं कोणाजवळ रडूही शकत नव्हते. कोणाला सांगणार होते मी माझ्या मनातलं? याचवेळी माझ्याकरता नीलचं स्थळ आलं आणि मी त्याची बायको बनून त्याच्या घराची मर्यादा बनले ! तेव्हापासूनच मला एकच प्रश्न आजपर्यंत उलगडला नव्हता,'समीर, तू माझ्या मनाचा राजा होऊ शकला असतास मग असा शत्रू बनलास तो का?'

दरवाजाची घंटी वाजली आणि मी भूतकाळातून परत वर्तमानात येऊन पोहोचले. बघितलं तर संध्याकाळ होत होती.. लाईट लावून मी दरवाजा उघडला,"नील तू आलासही?"

क्रमशः