बरेच दिवस झालेत... पावसामध्ये हुंदडलोच नाही
रिमझिमणाऱ्या धारांनी चिंब चिंब भिजलोच नाही
आज असं करू... हात हातात धरू...
बरसणाऱ्या पावसात मनसोक्त फिरू !
बरेच दिवस झालेत.... नदीकाठी गेलोच नाही
संथ पाण्याच्या थंडाव्यानं तृप्त आपण झालोच नाही
आज असं करू... ओचा आपला धरू...
खूप सारे शंख शिंपले त्यात गोळा करू !
बरेच दिवस झालेत... टिक्करबिल्ल खेळलोच नाही
'मी जिंकले, तूच हरलास..' म्हणत आपण भांडलोच नाही
आज असं करू.... नव्या घरात शिरू...
मनासारख्या रेषा आखून खेळ पूरा करू !
पण हे सगळं.... आज आपल्याला करता येईल का ?
पुन्हा एकदा....... हातात हात धरता येईल का ?