पण तु मात्र...

तुझ्या डोळ्यातील
आसवं होवून
तळहातावर विसावावं
क्षणभर...
पण तु मात्र
तटस्थ उभी असतेस
पापण्यांच्या काठावर


तुझ्या केसातील 
गजरा होवून
अलगद ओघळावं
मांडीवर...
पण तु मात्र
निस्पर्श असतेस
मिटलेल्या देहावर

तुझ्या अनावर वेगाचं
भान व्हावं क्षणभर
पण तु मात्र
पाठमोरी उभी असतेस
अधीरल्या डोहावर