राजस्थान ३ ( डेझर्ट एक्स्पेडिशन ) एक संस्मरणिय अनुभव

२९ डिसेंबर २००५ रोजी दुपारी एक वाजता बसने अखेर आमच्या ट्रेकला सुरवात झाली. आम्ही एकूण सहासष्ट जणं एका बॅचमधे होतो. या ट्रेकसाठी एकूण चार बॅचेस काढल्या होत्या. आमची बॅच सगळ्यात शेवटची असल्याने लिडर्सही हळहळले होते की आता या पुढे एकही बॅच कँम्पवर येणार नाही ( आणि त्यांनाही घरी परतावे लागेल. )


बॅचमधे माणसे भरपूर पण बसमधे जागा कमी असल्याने आम्ही काही जणांनी बसच्या टपावर बसून 'सम' गाठण्याचे निश्चित केले. बसमधे तर आपल्याला नेहमीच बसता येत पण टपावर बसण्याची मजा काही औरच असते. भर दुपारी टपावरचे सगळे थंडीने आणि वा-याने कुडकुडत होते. गप्पा मारत आम्ही तीन वाजता सम या गावी पोहोचलो.


सम येथे संपूर्ण वाळूचे डोंगर आहेत. येथे पर्यटकांची बरीच गर्दी होती. तेथील एका शाळेत आमच्या जेवणाची आणि रहाण्याची व्यवस्था होती. ताजेतवाने होउन आम्ही वाळवंटात भटकण्यासाठी बाहेर पडलो. तेथील बरीच लहान मुलं प्रत्येक ठिकाणी पर्यटकांकडून मिळणा-या ५-१० रुपयांसाठी नाचून दाखवतात. त्याला राजस्थानी लोकनॄत्य म्हणतात.


नंतर ७-८ जणांनी मिळून वाळूच्या डोंगरावरुन (उतारावरुन ) धावत खाली उतरायचे ठरवले. मी सुद्धा त्यांच्यात सामील झाले. पण त्यावेळी मला पुढे ओढवणा-या प्रसंगाची कल्पना नव्हती. वाळूतून धावताना माझा वेगावर नियंत्रण राहिले नाही . अचानक पाय वाकडा होउन पटकन गोलांटी उडी मारुन मी वाळूत आपटले. माझी मान पूर्ण धरली होती. पण तरीही मी वेड्यासारखी सॅक पाठीवर घेऊन ट्रेक पूर्ण केला. पूर्ण ट्रेकमधे मला एकच टेन्शन होते, मानेचे. मान दुखत्येय असं सारखं जाणवत होतं पण इलाजच नव्हता.


नेहमी प्रमाणे डाल-भात आणि गट्टा मसाला भाजी जेवून आम्ही कॅम्प फायरला सुरवात केली. यावेळी सर्वांचे मत पडले की, आपली मराठी गाणी न म्हणता आपण आज राजस्थानी गाणी ऐकूयात. गावातील एका राजस्थानी गाण्याच्या पार्टीला आम्ही बोलावले. त्यांनी "पधारो म्हारे देशसु, निंबुडा निंबुडा" अशी अनेक गाणी म्हटली. प्रत्येक गाण्याच्या आधी ते शेरो शायरी देखील ऐकवत. शायरीचा, त्यांच्या गाण्यांमधील अर्थ देखील त्यांनी सांगितला. तसेच आमच्या फर्माइशी देखील पूर्ण केल्या. सगळे नाचले, गायले. त्यामुळे वातावरणात वेगळे रंग चढले. थंडी ही वाढत होती. प्रोग्राम संपल्यावर आम्ही बेडिंगच्या शोधात आपापल्या खोलीकडे परतलो. अजून उद्याच्या कठीण कार्यक्रमाला तोंड द्यायचे होते.


                           ३० डिसेंबर २००५


आज आमची उंटावरची सफर होती. हा अनुभव सर्वांसाठीच वेगळा होता. ही सफर थोडी थोडकी नसून पाच तासांची होती. सकाळी सात वाजता सर्व जण उंटावरून पुढे जाण्यास तयार होते. मी आणि मानसी एकाच उंटावर बसलो होतो. प्रथम उंटवाल्याने मला पुढे आणि मानसीला मागे बसण्याचा सल्ला दिला. मनात उंटाबाबत थोडी भीती आणि शाशंकता असल्याने प्रथम मला नीट बसताच येईना. म्हणून मी, मानसीला पुढे बसवले व स्वतः मात्र गुपचूप मागे बसले. उंट उठू लागल्यावर अक्षरशः पोटात गोळा आला.पण शेवटी उंटवाल्याचा सल्ला मानला आणि मी पुढे बसावे असे ठरले.


 उंटवाल्याने उंटाला परत खाली बसण्याचा सल्ला दिला. ( अरे देवा ! ) आली पंचाईत !!! आता वर चढायचे कसे??? माझ्यासमोर प्रश्न होता आणि टेन्शनसुद्धा. तो उंट मात्र शांत बसून चरत होता. त्याला याचे काही गांभीर्यच नव्हते. मी सुद्धा मुर्खासारखं त्या उंटवाल्याला विचारलं "यह उंट और नीचे बैठेगा क्या??????". झालं, सगळे हसायला लागले. माझ्या टेन्शनची इथे कुणाला फिकिरच नव्हती. फक्त मजा-मस्ती चालू होती. आणि त्यांच्याबरोबर माझी ही. अखेर सरांच्या मदतीने यशस्वीरित्या मी उंटावर चढले. माझ्या मागे मानसी देखील चढली. अशी आमच्या दोघींची उंटावरून प्रवासाला सुरवात झाली. दुसरीकदे बाबा आणि मानसीचे बाबा यांचा ही उंट ऊठला होता. पण पुढे गेल्यावर त्यांच्या उंटाच्या मनात काय आले कुणास ठाऊक ? उंट अबाउट टर्न करून परत कॅम्पच्या दिशेने चालू लागला. बाप रे!!! ते दॄश्य पाहून आमचे हसूच आवरेना. उंटाला आवरताना बाबांची होत असलेली धडपड, काकांचा आरडा ओरडा बघण्यासारखे होते. उंटवाले मात्र गायबच झाले. त्यांनी त्यांचे उंट आमच्या स्वाधीन केले होते. पण आम्हाला तरी सवय कुठे होती. कसे बसे आम्ही आपापले उंट मार्गी लावले.


अखेर सगळ्यांचे उंट सगळ्यांना घेउन उठ्ले आणि चालू लागले. ( कुणालाही पाडले नाही ) मधेच कुणाचातरी उंट भरकटायचा ( म्हणजे वेगळीच दिशा पकडायचा ) मग त्याला मार्गावर आणण्यासाठी आमची अगदी तारेवरची कसरत होत असे.  ४-५ उंट एकत्र आले की आम्ही रेस ही लावत असू.


माझ्या उंटाचे नाव 'जवान' होते. ( बहुतेक माझ्या आर्मीच्या पँट्कडे बघून त्या उंट्वाल्याने मला 'जवान' उंटावर चढवले होते. ) रेस लावली की आम्ही अगदी गळा फाडून उंटाला प्रोत्साहन देत असू.


'' चलो जवान , चलो!! कमॉन जवान !!! लेट्स गो जवान !!!! '' अशा प्रकारे.


मजा म्हणजे, उंट्वाले उंटांना वेगवेगळ्या भाषांमधे इशारा देत होते. कधी हिंदी , मधेच राजस्थानी तर कधी इंग्रजीतही, नाही तर कधी फक्त  हूररररररर्र चक चक चक... ( असा इशारा म्हणजे वेगात धावण्याचा ) आम्हीही आता उंटांच्या इशा-यात बोलू लागलो. आता उंटांना आणि आम्हाला रेस्ट करण्याची नितांत गरज होती. आमचे वजन पेलून उंट थकले होते आणि उंटाच्या चालीमुळे ,वेगामुळे आम्ही थकलो होतो.


तब्बल तीन तासांनी आम्ही उंटावरुन उतरलो.  एक तर उन चढ्त होते , वाटेत कूठेही सावली नाही आणि सगळ्यात वाईट तर प्रत्येकाची ' चाल ' झालेली. कोणालाही सरळ चालता येईना. सगळेच जण उंटासारखे तिरपे पाय टाकत कसेबसे चालत होते. सलग ३ तास उंटावर बसून पाय अगदी भरून आले होते.     दहा मिनिट झाल्यावर उंट्वाल्याने सगळ्यांना जमवले. नाक मुरडत का होईना आम्ही परत उंटावर चढलो आणि उंटाचा लगाम हातात घेतला. या खेपेस आधी पुढे बसलेल्यांनी मागे बसायचे होते. आता मानसी पुढे आणि मी मागे बसले. एकंदरित आम्हाला मजाही तितकीच येत होती. अशा अवस्थेतही आम्ही स्वतःचे मन रमवण्याचा प्रयत्न करत होतो.


काय करणार, दुसरा पर्यायही नव्हता. बरं पुढेचे अंतर चालत कापायचे म्ह्टंल तर पायांची तशी कन्डिशनही नव्हती.                                              उंट उठताना किंवा बसताना मागे बसलेल्यांची हालत खराब होते. उंटाची उठण्याची किंवा बसण्याची पद्धत बदलली पाहिजे तर जरा बरे पडेल, असा विचार एकदा मनात आला पण दुस-यांदा असे वाटले की मग यातली मजाच निघून जाईल.


आता या उंट सफारीला आम्ही सरावलो होतो. शेवटी या रेसमधे जी घोड्दौड आपलं उंट्दौड केली ती फक्त आम्हालाच माहित आहे. उंट ज्या वेगाने धावतो, बापरे!! आपल्याला जीव मुठीत घेऊनच बसवे लागते.  आता पडू की नंतर अशी अवस्था होते. अशी कसरत करत का होईना आम्ही ' बीदा ' या गावी पोहोचलो आणि जी माणसं उंटावर बसलेली असताना उंटाला नाव ठेवत होती, शिव्या देत होती , तीच आता , '' काय मजा आली . एक वेगळा अनुभव मिळाला . पाच तास उंटावरील सफरीचा'', अशा प्रकारचे बोल बोलू लागली. सगळ्यांच्या तोंडावर एकच उदगार होते ,"प्रवासात त्रास झाला,पण मजाही तितकिच आली".


आमच्या खत्यात उंट सफरीचा एक नवा अनुभव जमा झाला. '' बीदा '' गावी २.३० वाजता ( दुपारच्यावेळी ) पोहोचल्यावर सर्वप्रथम फ्रेश होवून आम्ही डबे उघडले . दिवसभराचे श्रम होते. शरीराचा प्रत्येक अवयव ठणकत होता.


शेवटी चौदा किलोमीटर उंटावरून हेही एक दिव्यच होते.


नंतर कॅम्पवर जी ताणून दिल्येय ती एकदम संध्याकाळी ५.३० वाजता जाग आली. ( तब्बल तीन तासांनी )


मग आम्ही गाव फिरून येण्याचा प्लॅन आखला. आमच्यापैकी ज्यांना अजिबातच इच्छा नव्हती ते कॅम्पवरच थांबले. आणि मी मात्र रिझर्व्ह बँकवाल्यांबरोबर गाव भटकायला बाहेर पडेल. ''बीदा'' गाव प्रत्यक्षात फार सुंदर आहे. आम्ही राजस्थानमधील ज्या गावांना भेटी दिल्या होत्या त्यापैकी सर्वात सुंदर आणि मनात भरेल असे गाव म्हणजे 'बीदा' . हे गाव बॉर्डरपासून फक्त ३० कि.मी. अंतरावर आहे.


येथील स्थानिक लोकांना मी विचारले ,'' तुम्हाला बॉम्ब फेकल्याचे किंवा फायरिंगचे आवाज ऐकायला येतात का??? '' तेव्हा त्यांनी सांगितले ,  " मॅडम , यहाअँ पर बंबार्डिंग तो इतनी नही होती लेकिन जब पाकिस्तानी फायरिंग करते हैं, तो हमरे सैनिक भी उन्हें मुहतोड जवाब देते हैं "


        बीदा गावी अशा अनेक गोष्टी ऐकण्यास आणि पहण्यास मिळाल्या. तेथील घरांची रचना फार सुंदर आहे. आपल्या गावातील घरांप्रमाणेच त्यांच्याही घरांबाहेर पडवी असते. आत मधे मोठे अंगण , तिथेच बाजुला त्यांची एक खाट आणि समोर छोट्सं घर . या घरात फक्त झोपण्याची सोय केलेली होती बाकी सामान काहीच नाही. एका घरात धान्याची साठवण दिसत होती . गावामधे जवळपास १००० माणसे आहेत. आम्ही गेल्यावर त्यांनी सर्वांना चहासाठी विचारले . इतर लोकांनी चहा घेतला पण मी मात्र या वेळेस शेळीचे दूध घेतले. पण हे दूध पिववत नाही अगदी.. नंतर सूर्यास्त पाहून आम्ही कॅम्पवर परतलो. हे गाव नेहमी माझ्या मनात राहिल.


रात्री अर्धा तासच कॅम्प फायर केला. त्या नंतर बसण्याची कोणातही ताकद नव्हती .


क्रमशः