'इंडिया' कसा आहे?


'इंडिया'ची ट्रीप नुकतीच संपली होती
अवघ्या चार आठवड्याचा तो कवडसा...
मैत्रिणीने विचारले, "इंडिया कसा आहे?"


आता त्या प्रश्नाला उत्तर तरी काय देणार?
इथे आहे एक केविलवाणा प्रयत्न...


'इंडिया' हा असा आहे :
  पावसाचा पहिल्या थेंबा सारखा,
  मातीच्या ओल्या गंधा सारखा,
  पहाटेच्या कोवळ्या उन्हा सारखा,
  प्राजक्ताच्या सडा सारखा...


  पणतीच्या मिणमिणत्या तेजा सारखा,
  गाभाराच्या धुपाच्या वासा सारखा,
  मंद वाऱ्याच्या झुळुक सारखा,
  आणि दूरवरच्या देऊळाच्या घण्टा सारखा !


'इंडिया' असा ही आहे :
  ८:०२ च्या लोकलच्या गर्दी सारखा,
  ६:२२ च्या गर्दीच्या घामा सारखा,
  तिकिटाच्या खिडकीवरच्या हमरी-तुमरी सारखा,
  लाचार नजरेच्या कुत्सित हसू सारखा...


   कुजलेल्या कचऱ्याच्या ढीगा सारखा,
  रंगीत जिलबीवर भुणभुणणाऱ्या माश्यांसारखा,
  अंधाऱ्या जिनाच्या कोपऱ्यातल्या पिंके सारखा,
  आणि कधी एस-४ डब्यातल्या रात्री सारखा !


काय काय सांगू? अजून तर बरेच राहून गेले--
  मिठागराच्या वाफ्यांसारखा,
  त्या कामगारांच्या पायातल्या भेगां सारखा,
  भाऊला कडेवर घेऊन मागत असलेल्या ताईच्या डोळ्यांसारखा,
  तर कधी तिच्या टोपलीतल्या गजऱ्यासारखा...


  भाजीआजीच्या 'सेलफोन' सारखा,
  रिक्षामामाच्या 'रामरक्षा' सारखा,
  आता वयस्क झालेल्या शिंप्यासारखा,
  तर कधी आजोबांच्या न्हाव्यासारखा !


आणि, जिव्हाळ्याचे सांगायचे, तर...
  आई आणि आज्जीच्या मायेसारखा,
  बापाची करारी सारखा,
  मैत्रिणीच्या कानगोष्टी सारखा,
  भावाच्या ओवाळणी सारखा...


  नुकताच उमललेल्या सोनटक्क्यासारखा,
  पहिल्या गुलाबाच्या पाकळी सारखा,
  पहाटेच्या साखरझोपे सारखा,
  आणि पिलूची ओली पापी सारखा...


परिमा.


ता.क. हे आहे माझ्या कॅलिडोस्कोपमधले काही देखावे...
        कृपया चू. भू. द्या̱. घ्या.