गाणं (म्हणताना)

भाण्डारकरांनी कुसुमाग्रजांचा आधार घेऊन "गाणं ऐकण्याविषयी" लिहिलं आहे, मी त्याच धर्तीवर असणारी पाडगावकरांची कविता इथे देत आहे. यात "गाणे म्हणणाऱ्याची" भूमिका सांगितली आहे.


                     गाणं!


गाय जवळ घेते नी वासरू लुचू लागतं
आपण गाऊ लागतो नी गाणं सुचू लागतं


गाणं जसं जनात आपण गाऊ शकतो
गाणं आपल्या मनात आपण गाऊ शकतो
जनात गायलात म्हणून तुम्ही मोठे नसता
मनात गायलात म्हणून तुम्ही छोटे नसता
एक गोष्ट नक्की असते तिन्ही त्रिकाळ पक्की असते
आपलं गाणं आपल्याला पटलं पाहिजे
आणि गाण्यावर प्रेम करत तुम्ही म्हटलं पाहिजे ॥


असंच असलं पाहिजे असं गाण्यावर बंधन नसतं
असंच नसलं पाहिजे असं गाण्यावर बंधन नसतं
गात गात केंव्हाही जाता येतं
आपलं गाणं केंव्हाही गाता येतं.
एकटं एकटं चालताना गाणं म्हणता येतं
धुणी वाळत घालताना गाणं म्हणता येतं
चुलीपुढे रांधताना गाणं म्हणता येतं
मच्छरदाणी बांधताना गाणं म्हणता येतं
जेव्हा आपला सूर लागतो बाथरूममध्ये न्हाताना
भरली बादली डुलू लागते आपण गाणं गाताना
फांदीतून पान फुटावं तसं गाणं फुटलं पाहिजे
आणि गाण्यावर प्रेम करत तुम्ही ते म्हटलं पाहिजे ॥१॥


तुमचं आणि माझं जेव्हा मन जुळतं
त्याच क्षणी दोघांनाही गाणं कळतं
माझ्या पावसात मग तुम्ही न्हाऊ लागता
तुम्हीच माझ्या गळ्यातून गाऊ लागता
कधी गाणं मिठीचं कधी आतूर दिठीचं
कधी गाणं एकाचं कधी एकमेकाचं
गाणं हेच गाण्याचं मोल असतं
गाण्यापुढे बाकी सारं फोल असतं
फूटपट्टी घेऊन गाणं मापता येत नाही
द्वेष करून गाण्याला शापता येत नाही
झऱ्यासारखं आतून गाणं फुटलं पाहिजे
आणि गाण्यावर प्रेम करत तुम्ही ते म्हटलं पाहिजे ॥२॥


पण एक गोष्ट नक्की असते तिन्ही त्रिकाळ पक्की असते
आपलं गाणं आपल्यालाच पटलं पाहिजे
आणि गाण्यावर प्रेम करत तुम्ही ते म्हटलं पाहिजे.


                                   मंगेश पाडगावकर.