बातम्या!!

टिंग..डिंग.. दंग.. डिंग.. टिंननन....


(हे सुरवातीचे संगीत होते)


नमस्कार!


स्वयंपाकघरातील बातमीपात्रात आपले स्वागत आहे. रात्रीचे साडेदिड वाजले आहेत. आमचा म्याव म्याव कुत्रा शिळ्या बातम्या देत आहे.


प्रथम काही ठळक बातम्याः


१. मुंग्यांच्या दंगलीत २० ठार.. ५० जखमी.


२. ५ कांद्यांची विळीकडून हत्या.


३. पुरीबाईंचा आत्महत्येचा प्रयत्न.


आता बातम्या विस्ताराने.


स्वयंपाकाचा ओटा ह्या शहराजवळ असलेल्या कडाप्पाचा रॅक ह्या गावामध्ये आज काळ्या मुंग्या व लाल मुंग्या ह्या दोन जमतीत दंगल घडली. गुळाचे दावेदार कोण ह्या मुद्द्यावरून दंगल उसळली असे आमच्या सूत्रांकडून खात्रीलायकरीत्या समजले. काही काळ्या मुंग्यांना फिरताना गुळाचा डबा ह्या मुंग्यांच्या धार्मिक स्थळाजवळ काही गुळाचे तुकडे मिळाले. ही आनंदाची बातमी देण्यासाठी ते आपल्या वसाहतीकडे गेले व इतर आणखी मुंग्यांना घेऊन आले. परत आले त्यावेळी काही लाल मुंग्यांनी त्या गुळावर कब्जा केलेला काळ्या मुंग्यांना आढळले. गूळ कुणी न्यायचा त्यावरून ह्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. ह्या हाणामारीत १० काळ्या मुंग्या, १० लाल मुंग्या ठार झाल्या. तसेच ३५ लाल मुंग्या व १५ काळ्या मुंग्या जखमी झाल्या. शेवटी जमावाला पांगविण्यासाठी डीडीटी ह्या सुरक्षा यंत्रणेला पाचारण करावे लागले. डीडीटीने गुळाच्या डब्याशेजारील ६ फूट जागेत कायमची संचारबंदी लागू केलेली आहे.


फ्रीजखालील बुट्टीत असलेल्या कांद्यांपैकी ५ कांदे सहज फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्यावेळी विळीताईंकडून त्यांची निर्घृणपणे चिरून हत्या करण्यात आली. हत्या झाल्यावर सर्व अवशेष तवा नावाच्या पठारावर टाकण्यात आले होते.


लाटणेकाकूंच्या जाचाला कंटाळून पुरीबाईंनी उकळत्या तेलात उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण प्रसंगावधान राखून आपल्या जीवाची तमा न बाळगता श्री. झारेरावांनी त्यांचे प्राण वाचवले. झारेरावांच्या प्रेमामुळे पुरीबाई आनंदाने फुगून गेल्या आहेत.


तर हे होत कालच बातमीपत्र. उद्या कोणत्याही वेळी परत काही शिळ्या बातम्यांसहित भेटू (जमलं तर).


नमस्कार.