माझी शाळेतील मजा!

एकदा आमचा भौतिकशास्त्राचा तास सुरू होता. आमचे गुरुजी (मला अजूनही नाव आठवतंय.. पाटणेसर) आम्हाला पारदर्शक घनवस्तूंमधून प्रकाशकिरणांचे वक्रीभवन हा विषय शिकवत होते. सरांनी टेबलावर एक प्रिझम, २ टाचण्या आणि एक पुठ्ठा एवढे प्रयोगाचे साहित्य ठेवले होते. (तसे त्यांचे इतर साहित्यपण होते). सरांनी आम्हाला प्रयोगाची पद्धत शिकवली. त्यानंतर प्रत्येकाने सरांजवळ जाऊन तो प्रयोग करायचा होता.


प्रयोग असा होताः


पुठ्ठ्यावर एका बाजूला एक  टाचणी उभी केली होती. तिच्यापुढे प्रिझम ठेवला होता. प्रत्येकाने येऊन दुसरी टाचणी पहिलीच्या समोर सरळ रेषेत लावायची होती.


प्रत्येकाने जाऊन टाचणी लावण्यास सुरवात झाली. माझी टाचणी पहिल्याच प्रयत्नात बरोबर लागली (कसं काय देव जाणे). त्यामुळे आनंदाने सरांनी मला त्यांच्या खुर्चीवर इतरांची परीक्षा घ्यायला बसवले आणि स्वतः शेवटी जाऊन बसवले. जेव्हा मी पुढच्या मुलाने येऊन टाचणी लावली तेंव्हा ती बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रिझमपुढे वाकली व एक डोळा बंद केला. त्याचवेळी पुढील बाकांवरील काही मुलांनी 'काय रे, मुलींना डोळा मारतोस काय' अशी हलक्या आवाजात ओरड सुरू केली. (मनात त्या मुलांना खाऊ की गिळू असे होत होते)


त्यामुळे मी दोन्ही डोळे उघडे ठेवले. त्यावेळी सरांनी मागून परत मला एक डोळा बंद करण्यास सांगितले. (नाहीतर व्यवस्थित दिसणार नाही). मी डोळा बंद केल्यावर परत मुलांचा ओरडा सुरू झाला. शेवटी मी सरांचा डस्टर एका डोळ्याच्या मध्ये ठेवला आणि ती वेळ निभावून नेली.


दुसऱ्या दिवशी परत सरांनी तोच प्रयोग ठेवला आणि मलाच पुढे परीक्षणाला बसवले. फक्त त्यावेळी केवळ प्रयोगाचेच साहित्य टेबलावर होते. आणि प्रिझमची दिशा मुलींच्या बाजूने वळविण्यात आली होती कारण त्यादिवशी प्रयोग करण्याची पाळी मुलींची होती.


(नंतर कळले एका आगाऊ मुलाने तास संपल्यावर खरी मेख सरांना सांगितली होती.) काही का असेना प्रयोगामुळे सरांदेखत मात्र मी एक डोळा बंद करून मुलींच्या दिशेने बघत होतो.. दुसऱ्या परीक्षणासाठी..