संधी - भाग १

असेच एक आटपाट गाव होते. गाव तसे लहान, अगदि तालुक्याच्या दर्जाचे देखिल नसेल, पण अशा गावात देखिल एक महाविद्यालय होते,  अर्थात यथातथाच हे वेगळे सांगायला नकोच. 


महाविद्यालयात कला आणि वाणिज्य शाखां असल्यामुळे दोन अर्थशास्त्राचे प्राध्यापकही होते , प्रा. खडपे आणि प्रा. सि.जी.कुलकर्णी.


प्रा.सि.जी.कुलकर्णींना सगळे 'सिजीके' म्हणत,  प्रा. खडपे मात्र 'प्रा. खडपे' च होते.


सिजीकेंचे वर्णन काय करायचे , जसे 'आटपाट गाव' असते तसेच हे 'आटपाट कुलकर्णी ' होते, तसे ते मुळचे पुण्याचे पण ह्या आंवंढ्या गावात खितपत पडले आहेत असे त्यांचे मत होते! कपाळभर आठ्या घालत , चिडत, चर्फ़डत त्यांचे एकच पालुपद 'मी किती हुषार, विद्वान, व्यासंगी , ख्ररेतर मी नियोजन मंडळाचा अध्यक्ष व्हायच्या योग्यतेचा पण.. मला संधीच मिळाली नाही आणि ह्या अडाणी गावातल्या ह्या दळभद्री महाविद्यालयात, सातवी पास व्हायची सुद्धा लायकी नसलेल्या पोरांसमोर रोज तेच तेच दळण दळावे लागते.. छे मला संधीच मिळाली नाही, नाहीतर मी कुठल्या कुठे पोचलो असतो..'


प्रा.खडपे, एक साधीसुधी व्यक्ती, मुळचे त्याच गावातले, लहानसे घर, छोटासा कोरडवाहु जमिनीचा तुकडा आणि ही महाविद्यालयातली नोकरी, बस्स खडपे ह्यातच सुखी समाधानी होते.  खडपे त्यांच्या आख्या घराण्यात शाळेत गेलेले पहिले, आपण चार बुके शिकलो, बि.ए., एमे झालो ह्याचेच त्यांना केव्हढे अप्रुप, त्यामुळेच असेल कदाचित पण खडपे कामात मात्र चोख होते ! पुढ्यात आलेले काम मन लावुन करायचे,आपल्या परीने ते जास्तीतजास्त निर्दोष, सुबक होईल असे बघायचे.  एव्हढे शिकले, महाविद्यालयात प्राध्यापकी करत असले तरी त्यांची काळ्या आईशी नाळ तुटली नव्हती, बांधा वरचा गणप्या अजुनही त्यांचा मित्रच होता.


सिजीकेंशी ही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, 'छे मला संधीच मिळाली नाही, नाहीतर मी कुठल्या कुठे पोचलो असतो..' हे चे पालुपद सिजीकें च्या बायको नंतर सर्वात जास्त वेळा खडपेंच्याच कानांवर तर आदळायचे ,  मौज वाटायची पण खडपे काही बोलायचे नाहीत.


असेच एके दिवशी, सिजीके त्यांची तासिका संपवुन म्हणजे त्यांच्याच भाषेत बोलायचे तर 'दळण दळुन' नुकतेच कुठे विसावले तोच प्राचार्यांचे बोलावणे आले, कपाळावरच्या आठ्या आणखी वाढवत आणि अर्थातच चर्फ़डत सिजीके प्राचार्यांच्या कक्षात पोचले.


"हे पहा सिजीके, आपल्या विद्यापीठा कडुन एक पत्र आले आहे, डॉ. स्वामीनाथन - अधिष्ठाता अर्थशास्त्र विभाग" - प्राचार्य म्हणाले.


सिजीके त्रासले, मनात म्हणाले "आता आणि कसले नवे भोग भोगायचे.."


" डॉ. स्वामीनाथनना एका संशोधनासाठी आपली मदत हवी आहे. 'सहकाराचा ग्रामीण समाजरचने वर परिणाम ..' असा काहीसा विषय आहे. त्यासाठी आपल्या भागात पाहणी करुन एक अहवाल पाठवुन द्यायचा आहे, अहवाल किमान ५० मुलाखतीं वर आधारित असावा व त्यासाठी  एक प्रश्नावली पण पाठवली आहे. प्र्त्येक मुलाखती साठी १० रु व अहवाला साठी १०० रु मानधन दिले जाणार आहे"


 


(पुढील भागात वाचा)