राजस्थान ४ (डेझर्ट एक्स्पेडिशन) एक संस्मरणिय अनुभव

आज ३१ डिसेंबर २००५, सकाळी उठल्याबरोबर रात्रीच्या कॅम्प फायरसाठी प्रोग्रॅम बनवू लागलो. आज आमचे जागरण होते, रात्री १२.०० वाजेपर्यंत आणि आजच्या कॅम्प फायरमधे नाविन्यही पाहिजे होते. प्रत्येकाची नवीन कल्पना होती.


रोजच्या प्रमाणे सकाळी ७.३० वाजता पॅकलंच घेऊन आम्ही चालायला सुरवात केली. आजचा पूर्ण दिवस आम्हाला सतत चालत रहायचे होते, पुढचा कॅम्प गाठण्यासाठी. कॅमल सफारीने सगळेच थकले होते पण आज आम्हाला नव्या जोमाने जास्त पल्ला गाठायचा होता. अंतर होते १४ कि.मी.


माझ्या मनात आले की, सह्याद्रीमधे १४ कि.मी. काही फार जाणवत नाहीत तसेच इथेही असेल. ३ तासात आपण दुसरा कॅम्प गाठू. माझा अनुभव गाठीशी बांधून मी चालायला सुरवात केली. पण मी जो अंदाज बांधला होता त्यापेक्षा दुप्पट वेळ लागला. वाळूतून चालताना जोर लावावा लागतो‍. जास्त दमछाक होते. उन्ह चढत होती. तसेच रस्ता दाखविण्यासाठी आमच्या बरोबर जो माणूस होता, त्याने ही वाळवंटातून कूठून कूठून आम्हाला फिरवून आणले .आमच्या कॅम्प लिडर्सनी त्याला सांगितले होते "बॅचला दुपारी ३.०० वाजेपर्यंत कॅम्पवर पोहोचव म्हणजे आम्हाला तयारीसाठी थोडा वेळ मिळेल". म्हणून त्या उंटवाल्याने ( तिथे तोच आमचा गाईड) आम्हाला ड्यून्स वरून (वाळूच्या डोंगरांवरून ) फिरवून आणले. अंतर प्रत्यक्ष कमी असले तरी वाळूतून चालल्याने जास्त वेळ लागत होता.


सकाळी ८.०० ते दुपारी ४.३० आम्ही चालत होतो. ८/९ तास आम्हाला उंटासारखं राबवले होते. शेवटी बोलून चालून तो उंटवालाच. मला आठवतय, आम्ही सगळे त्याच्यावर फार वैतागले होतो. पण तरीही नाईलाजाने त्याच्या मागे मागे चालत होतो.


तिथे दूर दूरवर नजरेच्या टप्प्यात काहीच आढळत नाही. कुणाचं घर नाही, विहिर नाही, माणसं नाहीत. एखादा माणूस हरवला तर कुणाला पत्ताच लागणार नाही. म्हणूनच बहुतेक पदोपदी लीडर्स आम्हाला सावध करत आणि सर्वांनी एकत्र रहाण्याचा आदेश देत.


शेवटी दुपारी ४.३० वाजता चव्हाणी गावी कॅम्पवर पोहोचलो. सर्वांच्या तोंडावर एकच बोल होते "यासाठीच केला होता का आम्ही अट्टाहास!!!"


कॅम्पमधे बातमी पसरली, वाळ्वंटात सूर्यास्ताच्या वेळी मोर येतात आणि ते ही कळपाने. झालं!!! आम्हाला तर निमित्तच हवे होते, कॅम्पच्या बाहेर पडण्यासाठी भटकायला जाण्यासाठी... थोडावळ झोपही झाली होती. त्यामुळे बरं वाटत होतं.


पण आमच्यापैकी बरेच जण आंघोळी उरकण्यात मग्न होते. कारण एथे व्हाय.एच.ए. ने फ़क्त आमच्यासाठी मुबलक पाण्याची सोय केली होती. ७/८ दिवस बिना आंघोळीचे असल्याने विहिर पाहताच अर्धे अधिक लोक तेथे पळाले.


पण आमच्या मनात विचार आला की, सूर्यास्ताच्यावेळी वाळवंटात मोर पहाण्याची संधी कधी मिळेल??? म्हणून ६/७ जणांचा ग्रुप करून आम्ही (परत) चालू लागलो.


सूर्यास्ताला थोडावेळ होता म्हणून प्रथम आम्ही गावात शिरलो. गाव पाहिले. तेथील स्थानिक लोकांना त्यांच्या आयुष्याविषयी, रहाणीमानाविषयी काही प्रश्न विचारले. त्यांच्याशी गप्पा मारल्या. मग शरीरातील उरले सुरले प्राण एकवटून कॅम्प पासून २ कि.मी. अंतरावर मोर पहाण्यासाठी गेलो आणि खरोखरच सूर्यास्त पाहताना मोर दिसले. अगदी जवळून नाही कारण माणसांना पाहून ते पळायचे. पण वाळूच्या डोंगरांवरून तुरूतुरू मोर धावताना पाहीले आणि क्षणभर नेत्र सुखावले. कष्टाचे चीज झाले.


त्या दिवशीची रात्र सर्वांसाठीच खास होती.                                           ३१ डिसेंबरची रात्र.. न्यू इयरेची रात्र...


आम्ही कॅम्प फायरला सुरवात केली. रात्री ८.०० वाजता आम्ही बसलो पण या खेपेस शहाणपणा करून शाळेतल्या खोलीतच बसलो. कारण उघड्या माळरानावर थंडी वाजते आणि जास्त वेळ बसवत देखिल नाही. पण आज रात्री १२.०० वाजेपर्यंत आम्हाला जागरण करायचे होते. नॉन स्टॉप हिंदी (जुनी) गाणी, देशभक्तीपर गीते, जोक्स, कोडी सांगत, नाचत ,गात आम्ही ती रात्र जागवली. रात्रीचे १२.०० वाजले. कॅम्प्वर एकच जल्लोष झाला;;;


                                   हॅप्पी न्यू इयर   


सगळे एकमेकांना शुभेच्छा देण्यात मग्न होते . हे सेलिब्रेशन कायम माझ्या स्मरणात राहील.


आम्ही एका वेगळ्या प्रकारे ३१ डिसेंबर साजरा केला होता.


रात्री १.०० वाजेपर्यंत सर्व जण झोपी गेले. कारण अजून ट्रेक बाकी होता आणि दुस-यादिवशी तर मोठी मजल मारायची होती. त्यासाठी रात्रीची थोडीफार शांत झोप आवश्यक होती. एनर्जी रिचार्ज करण्याची गरज होती.


क्रमशः