नागफणी सुळका ( ड्युक्स नोज )

बोरघाटातून खंडाळ्याच्या वाटेवर जाताना सह्याद्रीच्या डोंगररांगातील एक एक टोक वर आभाळात घुसलेलं दिसतं. आजुबाजुच्या सह्याद्रीच्या रांगांपेक्षा त्याची ठेवण काही वेगळीच दिसते. जसा फणा काढून उभा रहिलेला नाग.


तोच हा खंडाळ्याचा प्रसिध्द 'नागफणी सुळका.' त्याचच इंग्रजीकरण म्हणजे 'ड्यूक्स नोज'. सह्याद्रीच्या डोंगररांगांमधे असे अनेक सुळके गगनाला गवसणी घालत उभे आहेत. सह्याद्रीची निर्मितीच मुळी ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे झाली आणि या उद्रेकामधे उफाळलेला लाव्हारस आधीच थंड झालेल्या लाव्हारसाच्या भेगांमधे जाऊन थंड झाला. या ' डाईक अश्म ' रचनेमुळे सह्याद्रीच्या रांगांमधे असे अनेक सुळके तयार जालेले आहेत. अशाच भूस्तरीय रचनेमुळे नागफणीची निर्मिती झाली. कोकणाकडील पायथ्यापासून टोकापर्यंत नागफणीची उंची अंदाजे ८५० फूट आहे. या सुळक्याची रचना अंदाजे अंतर्वक्र आहे. पहिल्या ३०० फूट आणि खाली ५०० फूट यामधे असलेल्या एका भेगेमुळे नागफणी दोन भांगामधे विभागला गेला आहे. नागफणीच्या उत्तरेकडील बाजूला आहे नागफणीचा ' विंचूकाटा' म्हणजेच एकसंध पाषाणभिंती. विंचूकाटा आणि नागफणी या दोघांमधे आहे ' डचेस ' हा मोकळा भाग.


                         ऐतिहासिक पार्श्वभूमी


नागफणीचा आसमंत अनेक ऐतिहासिक किल्ल्यांनी आणि घाटांनी वेढलेला दिसतो. नागफणीच्या उत्तरेला आहे राजमाची किल्ला आणि कोंढाणी लेणी. तर दक्षिणेस आहे कोरीगड, सुधागड आणि सरसगड . तर पूर्वेस आहेत लोहगड , विसापूर , तुंग ,तिकोना हे किल्ले. पश्चिमेस आहेत माणिकगड, ईर्षाळगड, प्रबळगड आणि माथेरानचे पठार.


नागफणीच्या दक्षिण बाजूस असलेली उंबरखिंड ही तर शिवकालीन इतिहासात खूपच प्रसिध्द झाली. २ फेब्रुवारी १६६१ रोजी शिवाजी राजांनी याच उंबरखिंडीत ३० हजार फौज घेऊन कोकणात निघालेल्या करतलब खान या शायिस्तेखानाच्या मोगल सरदाराचा घनदाट तुंगा अरण्यात १ हजार सैन्यानिशी सपशेल पराभव केल आणि त्यास शरण येण्यास भाग पाडलं. अशा एक ना अनेक ऐतिहासिक घटनांनी नागफणीचा परिसर व्यापला आहे. वर्तमानात मात्र हा नागफणी सुळका आय.एन.एस. शिवाजीच्या हद्दीवर आहे आणि भविष्यात तो आय.एन.एस. शिवाजीचा एक भाग होण्याची शक्यता आहे.


१९८५ च्या फेब्रुवारी महिन्यात या सुळक्याच्या कातळभागातून आरोहण करत मुंबईच्या केव्ह एक्स्प्लोरर या संस्थेने हा सुळका प्रथम सर केला. तेव्हापासून अनेक आरोहक या नागफणीच्या सुळक्याला गवसणी घालत आले आहेत.


नागफणीचं खास वैशिष्ट्य म्हणजे टोकापासून पहिल्या ३५० फुटांमधे असलेल्या ओव्हरर्हँगचा भाग ( कातळाचा पुढे असलेला भाग ) . याच वैशिष्ट्यामुळे गिर्यारोहकच काय पण सामान्य लोकही या सुळक्याकडे आकर्षित होतात. याच सुळक्याच्या टोकावरून रॅपलिंगचा ( प्रस्तरावरोहण )म्हणजेच दोराच्या सहाय्याने कड्यावरून उतरण्याचा आनंद अनुभवणारे अनेक आहेत.


दि.२२ जानेवारी २००६ रोजी आम्ही रॅपलिंगसाठी कळव्याला गेलो. आम्हा सर्व मेंबर्ससाठी तेथे स्पेशल ट्रेनिंग ठेवले होते . या ट्रेनिंग नंतरच नागफणीला जाता येणार होते. त्यामधून तर मी पार पडले पण....


आता खरी कसोटी तर नागफणी सुळक्यावर!!!