नीज येईना रात्र सारी, कूस बदलतो वारंवार
भूताची ही सुरी दुधारी, आठवणींची संततधार
हिरवळीत बागडलो आपण, गालिचा मखमली दवार
भान हरपले काळाचे अन् सुखास नव्हता पारावार
रंग उधळले चमचमणारे, दिलास आयुष्या आकार
सहवासाने तुझ्या लाभली सोनेरी स्वप्नांस किनार
चैन तुजविण क्षणैक नव्हते, ओढ मीलनाची अनिवार
अरुणोदय तुजसवेच होई, तुझ्याविना होता अंधार
सांग फुलले प्रिये कशाने शीतल तव नयनी अंगार
निष्ठुर होऊन तोडलेस का नात्याचे धागे सुकुमार
निवडलीस तू वाट वेगळी, मांडलास परका संसार
सलतो तरिही का मजला तो स्पर्श स्मृतीतला अलवार
भास होतो मनास अजुनी, गात्रीं झंकारते सतार
अजुनी गंध उरास माझ्या, रुळला जेथे तव कचभार