नीतीनियमांच्या पहारेकऱ्यांनी, आणलाय आरोपी डांबुन
प्रत्यक्ष वायुलहरीलाच, आरोपीच्या कठड्यात घातलयं बांधुन
उच्चारले आरोप,हिच ती बेधुंदपणे वहाते..
हिच ती सीमा उल्लंघु जाते..
हिच ती नाही जुमानत कोणाला..
हिच ती नाही घाबरत बाणाला..
मान झुकवुन उभी लहर
बोलु म्हणली, आरोपांचा ओसरल्यावर बहर
मनातुन मात्र, ती पुरती गोंधळली
काय यात चुक माझी.. विचार करत राहीली
न्यायाधीश महाराज आरोपीची शांतताच बोलते
साऱ्या आरोपांची हिच कबुली सांगते
ठोठावली शिक्षा, यापुढे असं मुळी नाही चालणार
आता तुला, आम्ही, पंख्यालाच बांधुन घालणार
पंखा फिरेल, तरच तु फिरायचं
भिंतीच्या कुंपणातच, यापुढे रहायचं
उल्लंघुन या मर्यादा, नाही मुळी चालायचं
तेव्हापासुन लहर ती, एकाच खोलीत फिरते आहे
खिडकीबाहेरच्या झाडाचे, इशारे नजरेआड करते आहे
मनात एकच प्रश्न तिच्या "खरच का मी जिवंत आहे?"