राजहंस माझा निजला

हें कोण बोललें बोला?


'राजहंस माझा निजला!'


दुर्दैवनगाच्या शिखरीं। नवविधवा दुःखी आई!


तें हृदय कसें आईचें । मी उगाच सांगत नाहीं ।


जें आनंदेही रडतें । दःखांत कसें तें होइ--


हें कुणी कुणां सांगावें!


आईच्या बाळा ठावें !


प्रेमाच्या गांवा जावें--


मग ऐकावें या बोला । 'राजहंस माझा निजला!"


म्मंडीवर मेलें मूल । तो हृदया धक्का बसला ।


होउनी कळस शोकाचा । भ्रम तिच्या मानसीं बसला ।


मग हृदय बधिरची झलें । अति दुःख तिजवि चित्ताला ।
तें तिच्या जिवाचें फ़ूल ।
मांडीवर होत मलूल!
तरि शोकें पडुनी भूल--
वाटतची होतें तिजला।"राजहंस माझा निजला!'


जन चार भोंवतीं जमले। मृत बाळा उचलायाला।
तो काळ नाथनिधनाचा। हतभागि मना आठवला।
तो प्रसंग पहिला तसला। हा दुसरा आतां असला!


तें चित्र दिसे चित्ताला!
हें चित्र दिसे डोळ्यांला!
निज चित्र चित्तनयनांला,
मग रडुने वदे ती सकलां। "राजहंस माझा निजला!'


करुं नका गलबला अगदीं। लागली झोंप मम बाळा!
आधींच झोंप त्या नाहीं। खेळाचा एकच चाळा!
जागतांच वाऱ्यासरसा। खेळाचा घेइल आळा!


वाजवूं नका पाऊल!
लागेल तया चाहूल!
झोंपेचा हलका फ़ूल!
मग झओंपायाचा कुठला! राजहंस माझा निजला!


हें दूध जरासा प्याला। आतांसा कोठें निजला!
डोळ्याला लागे डोळा। कां तोंच भोवतीं जमलां?
जा! नका उठवुं वेल्हाळा। मी ओळखतें हो सकलां!


तो हिराच तेव्हा नेला!
हिरकणीस आतां टपलां!
परि जिवापलिकडे याला--
लपवीन! एकच मजला! राजहंस माझा निजला!


कां असलें भलतें सलतें। बोलतां अमंगळ याला!
छबकड्यावरुनि माझ्या या। ओवाळुनि टाकिन सकलां!
घेतें मी पदराखालीं। पाहूंच नका लडिवाळा!


मी गरीब कितिही असलें\
जरि कपाळ माझें फ़ूटलें।
बोलणें तरी हें असलें--
खपणार नाहिं हो मजला! राजहंस माझा निजला!


हें असेच सांगुनि मागें। नेलात जिवाचा राजा।
दाखविलाहि फ़िरुनी नाहीं। नाहिंत का तुम्हां लाजा?
न्यावयास आतां आलां। राजहंस राजस माझा!


हा असा कसा दुष्टावा?
कोणत्या जन्हिंचा दावा?
का उगिच गळा कापावा--
पाहुनी गरिब कोणाला। राजहंस माझा निजला!