वाचावे ते नवलच - ७ - दोन कठिण प्रश्न

मुलाखतीला आलेल्या एका उमेदवाराला विचारले गेले की त्याला दहा सोपे प्रश्न विचारावेत की एकच कठिण प्रश्न ? तो म्हणाला "एकच कठिण प्रश्न." मुलाखतकार सकाळचे वर्तमानपत्र वाचून आला होता. त्याने वाचले होते की जपानमधील सुझुकी कंपनीच्या तंत्रज्ञांना एक प्रश्न भेडसावत आहे, तो म्हणजे मारुती कारसाठी कशा प्रकारचे कुलुप शोधून काढावे?  वेगवेगळ्या अनेक प्रकारची कुलुपे त्यांनी लावून पाहिली पण भारतीय शर्विलकांनी सगळी उघडून गाड्या पळवल्याच म्हणे. ते यांत्रिक बिचारे आता अगदी हताश होऊन गेले आहेत.
"चोरांनी मोटारगाडीचे कुलुप उघडू नये यासाठी काय करावे? " असा प्रश्न विचारला गेला.
 "हा खरोखरच कठिण प्रश्न आहे. मोठमोठ्या जपानी तंत्रज्ञांनी जिथे हात टेकले, तिथे माझ्यासारखा नवशिका काय सांगणार? पण तुमच्या प्रश्नाचे उत्तर माझेकडे आहे. ते म्हणजे गाडीला कुलुप लावूच नये म्हणजे चोरांनी उघडण्याचा प्रश्नच येणार नाही. " उत्तर आले.
"पण मग चोर तुमची गाडी पळवून नेतील, त्यांना कसे शोधणार ?"
ही बातमी नवीन असली तरी विनोद जुनाच आहे्, त्यामुळे त्याचे उत्तर आपण ओळखलेले असेलच. तरीही ते शेवटी दिले आहे. तोपर्यंत दुसरा किस्सा.
 चोरांना कसे पकडायचे हाच प्रश्न जगभरांतील पोलिसांना नेहमीच पडलेला असतो. ब्रिटनमधल्या एका गांवातील पोलिसांनीच असे आवाहन केले आहे म्हणे की चोरांना सद्बुध्दी मिळावी, त्यांनी शरण यावे किंवा त्यांची संपूर्ण माहिती मिळावी म्हणून लोकांनी चक्क चर्चमध्ये जाऊन प्रार्थना कराव्यात. कदाचित हिंदी मराठी सीरियल्स तिकडे मोठ्या प्रमाणात दाखवल्या गेल्याचा परिणाम असेल. उमेदवाराने उत्तर दिले,"अहो मी सुध्दा सास बहू, नणंद भावजया वगैरेंच्या सगळ्या मालिका पाहतो, त्यामुळे यावरील रामबाण उपाय मला माहित आहे. परंतु मी तो सांगणार नाही कारण फक्त एकच कठिण प्रश्न विचारायचे आपण कबूल केले आहे. हा तर दुमरा कठिण प्रश्न झाला. "