एकरूप

एका चुकार लाटेनं, लटकं रागावून,


सांगितलं काही खडकांना वर उसळून.


खडक तो, खडकच बिचारा,


झेलून हजार लाटा, होता तो कोरडा.


वळली ती मग किनाऱ्याकडे


म्हणाली, तू तरी माझं म्हणणं ऐक गडे ...


किनारा म्हणाला, वेळ झाली ओहोटीची,


तू आपली परत जा कशी.


गेली ती क्षितिजाकडे ...


तिला येताना बघून क्षितिज गेलं अजूनच दूर.


त्याला तसं पाहून, तिच्या मनातलं गेलं मनातच राहून.


सागराला सांगितलं तिनं दुःख आपलं


साऱ्यांनी मला जणू वाळीत टाकलं.


सागराने हसून, घेतलं तिला आपल्यात सामावून.


खुदकन हसत तीही, गेली त्याच्याशी एकरूप होऊन!