साम्राज्य हादरवणारे 'वक्तव्य'

दिनांक १ जुलै १९०९ या दिवशी कर्झन वायलीला 'कॅक्स्ट्न सभागृहात' कंठस्नान घालून वज्रनिश्चयी मदनलाल धिंग्रा १७ ऑगस्ट रोजी पेंटनविले तुरुंगात ताठ मानेने व बेडरपणे फासावर गेला.


 


dhingra2


न्यायाचे पुतळे म्हणवून घेणाऱ्या इंग्रजांनी त्यांच्या खिशात लिहून ठेवलेले 'वक्तव्य' बिनबोभाट जप्त केले व दडपूनही टाकले. मात्र हे लिखित वक्तव्य जरी जप्त केले तरी मदनलालजींनी त्याच आशयाचे वक्तव्य न्यायालयात केले. फाशी सुनावण्या पूर्वी न्यायाधीशाने जेव्हा 'तुला काही साक्षीदार, पुरावे वा बचावाचे भाषण सादर करायचे आहे का?' असे विचारले तेंव्हा त्यांनी फक्त इतकेच सांगितले की माझे वक्तव्य इथे वाचून दाखवले जावे. न्यायाधीशाने दुर्लक्ष केले व वारंवार मागणी केल्यावर असे काही आपल्याला माहीत नसून तुला काही सांगायचे असेल तर सांग, आम्हाला तुझे वक्तव्य वगरे माहीत नाही असे सांगताच मदनलालजींनी ठामपणे सांगितले की अटक झाली तेंव्हा 'ते एक तावभर लिहिलेले वक्तव्य माझ्या खिशात वधप्रसंगी होते व ते पोलिसांनी जप्त केले आहे' असे सांगितले. मग त्या वक्तव्याच्या अनुपलब्धतेकारण त्यांनी साधारण आठवेल असे भाषण न्यायालयासमोर केलेः


"हा देश  जर्मनांनी पादाक्रांत केला असता त्यांच्याविरुद्ध एखाद्या इंग्रजाने लढणे हे जर न्याय्य असेल तर मी इंग्रजाविरुद्ध लढणे हे कितीतरी अधिक न्याय्य व देशाभिमानाचे आहे. गेल्या पन्नास वर्षांतील लक्षावधी हिंदुस्थानीयांच्या हत्येस मी इंग्रजांनाच उत्तरदायी समजतो व प्रतिवर्षी हिंदुस्थानातून १० कोटी पौंड आणण्यासही इंग्रजच उत्तरदायी आहेत. येथील इंग्रज जे आपल्या लोकांना करण्याचा उपदेश करतात व तेच करणाऱ्या माझ्या हिंदुस्थानांतील बांधवांना फाशी, काळेपाणी वा हद्दपारीच्या सजा देणाऱ्या इंग्रजांना उत्तरदायी मानतो. एक इंग्रज हिंदुस्थानात जाऊन दरमहा १०० पौंड कमावतो याचाच अर्थ तो माझ्या १००० गरीब देशबांधवांना देहान्ताची सजा देतो, कारण या कमाईवर हे जीव सहज जगले असते


ज्याप्रमाणे हा देश पादाक्रांत करायचा अधिकार जर्मनांना नाही त्याप्रमाणे इंग्रजांना हिंदुस्थान पादाक्रांत करायचा अधिकार नाही. आमची पवित्र भूमी भ्रष्ट करणाऱ्या इंग्रजांना आम्ही ठार करणे हे संपूर्णतः समर्थनीय आहे.एकीकडे हे इंग्रज कांगो व रशियातील पददलित जनतेचे कैवारी म्हणून मिरवीत आहेत त्याचवेळी ते हिंदुस्थानात जनतेचा भयानक छळ व अत्याचार करीत आहेत. मला त्यांच्या या ढोंगाचा व नाटकीपणाचा राग येतो व विस्मयही वाटते. जर उद्या हा देश जर्मनांनी जिंकला व रस्त्यावरून दिमाखाने जाणाऱ्या जर्मनांना एखाद्या इंग्रजाने ठार केले तर त्याचा देशभक्त म्हणून गौरव केला जाईल. मग मी तर माझ्या मातृभूमीच्या विमोचनासाठी खचितच सिद्ध आहे


मी हे वक्तव्य करीत आहे ते मला दया याचना करावयाची आहे म्हणून वा अन्य कोणत्याही स्वार्थी हेतूने नाही. इंग्रजांनी मला देहान्ताचीच शिक्षा द्यावी कारण तसे केल्याने माझ्या देशबांधवांचा प्रतिशोधही अधिक तीव्र होईल. हे वक्तव्य माझ्या ध्येयाची न्याय्यता बाह्य जगताला; विशेष करून युरोप व अमेरिकेतील सहानुभूतीकांना दाखविण्यासाठी मी न्यायालयापुढे करीत आहे "


दुसऱ्या दिवशी अनेक वर्तमानपत्रात मथळे झळकले


'धिंग्राचे विलक्षण वक्तव्य', 'धिंग्रा म्हणतो माझा प्रतिशोध माझे देशबांधव घेतील!', 'मी देशभक्त आहे', 'धिंग्रा हिंदुस्थानच्या अभ्युदयासाठी मरतो आहे'


धिंग्रांच्या या वक्तव्याने सरकार वायलीच्या वधापेक्षा अधिक हादरले.


इकडे मानवतेच्या पुजाऱ्याने 'भ्याड कृत्य', 'असमर्थनीय वर्तन' वगरे पोपटपंची केली. नामदार गोखल्यांनीही सभेत निषेध व्यक्त केला. तिकडे इंग्रजांच्या खुशामतखोर हिंदी नागरिकांनी एक शोकसभा व निषेधसभा आयोजित केली. अध्यक्ष ना. आगाखान असून उपस्थितांमध्ये कुचबिहारचे महाराजकुमार, सय्यद हुसेन बिलग्रामी, के‌ सी. गुप्त, सर मंचरजी भावनगरी, दिनशा पेटीट, फाजलभाइ करीमभाइ वगरे होते तर निमंत्रितांमध्ये बिपीनचंद्र पाल, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादासाहेब खापर्डे, एम. पी. टी. आचार्य, व्ही. व्ही. एस. आचार्य व स्वा. सावरकर होते. निषेधाचा ठराव मताला येताच अध्यक्ष म्हणाले म्हणजे 'सर्वांनाच मंजूर आहे तर'. "नाही, सर्वांना अजिबात नाही." एक दमदार निग्रही आवाज आला आणि सन्नाटा पसरला. आगाखान संतप्त झाले, भावनगरी धावून आले तर पामर नामक इंग्रज ते प्रखर राष्ट्राभिमानी उद्गार काढणाऱ्या स्वा. सावरकरांवर तुटून पडला व त्याने त्यांच्या नाकावरती भुवयांमध्ये ठोसा मारला. स्वा‌. सावरकरांचा चष्मा फुटून काच लागल्याने चेहऱ्यावर रक्त आले. संतप्त अय्यरांनी पामरवर बेभान होत पिस्तुलाला हात घातला, मात्र त्यांना स्वा. सावरकरांनी नजरेनेच दाबले, मात्र आचार्यांनी पामरच्या टाळक्यात काठी हाणली व अखेर अभूतपूर्व गोंधळात सभा उधळली गेली.


मुळात हे कृत्य करण्यात प्रेरणा व योजना स्वा. सावरकरांचीच असा सरकारच ठाम समज होता. अर्थात धिंग्रांच्या वक्तव्यातील भाषा पाहता ते अगदी स्वाभाविकच होते. लंडन टाईम्सने तर मागे एकदा म्हटलेच होते की भले विध्वंसक मार्गाचा अवलंब करण्यात बंगाल नजरेत भरत असेल, पण ज्यांनी या चळवळीला जन्म दिला आणि तिचे संगोपन केले ते बहुधा पश्चिम भारतात सापडतील. दि. ३ जुलै १९०९ ला लंडन टाइम्स म्हणतो ' अराजकवाद्यांच्या कार्याला यापुढे लंडन व पॅरिस येथून अधिकाधिक व कलकत्ता आणि पुणे येथून कमी मार्गदर्शन मिळेल' आता लंडन म्हणजे स्वा. सावरकर आणि पॅरिस म्हणजे श्यामजी कृष्ण वर्मा हे उघडच आहे.


आपले धुरीण मदनलालजींच्या हौतात्म्याला बदनाम करीत असताना लाला हरदयाळ, खापर्डे, श्यामजी, स्वा. सावरकर हे त्यांची प्रशंसा करीत होते. हिंदुस्थानी क्रांतिकारकच नव्हे तर जगाने या बलिदानाची तारीफ केलीः


लॉईड जॉर्ज यांनी मदनलाल धिंग्रांची एक देशभक्त अशी माझ्याकडे अतिशय गाढ प्रशंसा केली आणि माझीही तीच भावना आहे. रेग्युलस, प्लुटार्कस व कॅरॅक्ट्स यांच्या प्रमाणेच धिंग्राही दोन हजार वर्षांनंतरही स्मरला जाईल आणि त्याचे अखेरचे वक्तव्य म्हणजे देशभक्तीच्या  भावनेने उच्चारलेले सुंदरातले सुंदर  शब्द आहेत --- विन्स्टन चर्चिल.


हिंडमनचे 'जस्टीस', दि. १० जुलै ' दडपशाहीच दहशतवादाला जन्म देते'


१३  जुलै रोजी लंडन टाईम्सला लिहिलेल्या पत्रात श्यामजी कृष्णवर्मा लिहितात ' मदनलाल धिंग्राचे नाव ज्याने आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून प्राणांची आहुती दिली असा हुतात्मा म्हणून भावी पिढ्यांना ज्ञात होईल. त्यांच्या अंतिम भाषणातून प्रतींत होणाऱ्या धैर्य, सत्य आणि देशभक्ती यांनी त्यांना जगाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वोच्च स्थानावर विराजमान केले आहे.


'धिंग्रांची बेदरकर आणि उद्दंड वृत्ती बऱ्याच इंग्रजांना विस्मयाची वाटली' - लंडन टाइम्स.


'आपल्या देशासाठी सर्वस्व देणाऱ्या धिंग्रांचा आयर्लंड सन्मान करीत आहे' - असे लिहिलेली पत्रके व १२ इंची अक्षरांनी रंगलेल्या भिंती डब्लीन परिसरात दिसून येत होत्या.


लॉर्ड किचनेरने केलेल्या अत्याचारांचा बदला घेतला नाही म्हणून इजिप्तच्या बोत्रास पाशाचा वध करणारा देशभक्त इब्राहिम बारादानी व मदनलाल धिंग्रा यांच्यावर इजिप्तचे राष्ट्रीय बाण्याचे कवी इ. एल. घयाती यांनी एक सुंदर कविता रचली व त्याबद्दल त्याना एक वर्ष कारावास झाला.


  ' ख्रिश्चन धर्मातील कुणीही क्रांतिकारक धिंग्रां इतक्या बेडरपणे व उदात्तपणे न्याधिशांसमोर उभा राहिला नाही.धिंग्रांच्या निर्भय बाण्याची ५०० माणसे जर एकवटली तर हिंदुथान स्वतंत्र होईलच यावर आज माझे व खापर्डे यांचे एकमत झाले' - विल्फ्रेड स्कावेन ब्लंट (विद्वान इंग्रज लेखक व स्वा. सावरकर यांचा चाहता)


मदनलाल धिंग्रा यांचे सरकारने दाबून टाकलेले वक्तव्य स्वा. सावरकरांनी एक स्वातंत्र्यप्रेमी इंग्रज डेव्हिड गार्नेट याच्या साहाय्याने अखेर १८ ऑगस्ट १९०९ च्या 'डेली न्यूज' मध्ये प्रसिद्ध केलेच. सरकारने सर्व अंक जप्त केले मात्र हे भाषण सर्वतोमुखी झाले.


dhingra1


हे मूळ वक्तव्य व धिंग्राचे प्रकाशचित्र असलेले टपाल पत्र स्वा. सावरकरांनी प्रसिद्ध केले व त्याच्या विक्रीतून आलेले पैसे राष्ट्रकार्याच्या निधीत जमा केले.