नव्या नात्याची नवी ओळख उद्या नव्यानं करून घेऊ
चल ये आज चांदण्यात एकदा शेवटचं फिरून घेऊ !
विसरशील का राणी आपल्या आठवणींच्या बागा
इथेच ना तुझ्यात माझा.... गुंतला होता धागा
धाग्याधाग्यांची प्रीत आज आपण होऊन उसवून घेऊ
चल ये आज चांदण्यात एकदा शेवटचं फिरून घेऊ !
इथंच उभं होतो अन होत्या... गुंतलेल्या नजरा
नव्यानंच मागू पाहतात पुन्हा नवा आसरा
नजरा-नजरांचा झालेला खेळ आता इथेच विसरून जाऊ
चल ये आज चांदण्यात एकदा शेवटचं फिरून घेऊ !
इथेच मला जाणवला होता... तुझा वेडा स्पर्श
अन डोळ्यात तुझ्या दाटलेला... फुललेला हर्ष
त्या स्पर्शांना दुराव्याची नवी ओळख करून देऊ
चल ये आज चांदण्यात एकदा शेवटचं फिरून घेऊ !
नको दावूस राणी तुझी... पाणावलेली नजर
हळव्या मनाला माझ्याही फुटेल नव्यानं पाझर
ज्या वाटाच आपल्या नाहीत त्या वाटा पार विसरून जाऊ
चल ये आज चांदण्यात एकदा शेवटचं फिरून घेऊ !
पुन्हा आलीस जर इथे कधी तर एक लक्षात ठेव
तुझ्याही हृदयात होती... माझ्या प्रेमाची ठेव
मीही आलोच जर चुकून तर हसता हसता रडून घेऊ
पण आज मात्र चांदण्यात एकदा शेवटचंच फिरून घेऊ !