हिमालय ट्रेक ( यांकर पास एक्स्पेडिशन ) --भाग २

२७ एप्रिल २००६


प्रवासाची सुरवात मुंबई सेंट्रल येथून राजधानी एक्सप्रेसने झाली. राजधानीमध्ये आमची एका कुटुंबाशी ओळख झाली. ते दोघे नवराबायको आणि त्यांची दोन मुले जम्मू-काश्मिरला सहलीला निघाले होते. प्रवासात गप्पाटप्पा होत्या, खाद्यपदार्थांची ( आईने जबरदस्तीने दिलेला खाऊचा डबा, मावशीने आग्रहाने दिलेले लाडू ) एक्सचेंज चालू होती. वेळ कसा गेला कळलंही नाही.


दुस-या दिवशी सकाळी ८.१५ वाजता राजधानी मथुरेला पोहोचली, वेळेवर.मात्र नंतर ती फारच वेळ घेऊ लागली आणि अचानक कुठल्यातरी स्टेशनजवळील एका आड माळरानावर थांबली. पहिल्यांदी काहीच उलगडा होईना.ब-याच वेळाने खाली उतरल्यावर पाहिले की आमच्या पुढे पश्चिम एक्सप्रेस तर पाठी अजून एक गाडी थांबली होती.


जवळजवळ ४ तास आम्ही गाडीतच बसून होतो. पश्चिम एक्सप्रेस तर ७/८ तास अडकली होती. सगळीकडे बोंबाबोंब सुरू होती. ट्रेन्स अशा का अडकून पडल्या आहेत काहीच कळायला मार्ग नव्हता. ट्रेनमध्ये काही प्रवासी केसरी टूरचे होते. त्यांचे पुढील प्रोग्रॅम्स लगेच लांबविण्यात आले. परंतु असेही प्रवासी होते की ज्यांची लगेचच कनेक्टिंग बूकिंग्स होती. आता ती रद्द करावी लागणार ??? मग पुढच्या प्रवासाचं काय??? सर्वांच्याच पुढे प्रश्न होता.


 मग एक बातमी आली की मेडिकल स्टुडंट्सनी रेलरोको केले आहे. आता संध्याकाळपर्यंत तरी आपण दिल्लीत पोहोचत नाही याची खात्री पटू लागली. तिथून दिल्ली केवळ ७० कि.मी. होते. नशिबाने ट्रेनमधून आम्हाला २ कि.मी. वर हायवे दिसत होता. वाहनांची रहदारी दिसत होती. मला एकच टेन्शन येऊ लागलं की असच ट्रेनमध्ये बसून राहिलो तर पुढचा प्रोग्रॅम बारगळणार ? शेवटी ४ तास बसून काढल्यावर आम्ही पायी हायवेपर्यंत जायचं आणि दिल्लीसाठी बस पकडायची ठरवलं.


११.४५  दुपारी आम्ही राजधानी सोडली आणि अर्धा तास रपेट करत हायवेवर आलो. अवघ्या दहा मिनिटांत दिल्ली लोकल बस आली. बस-कंडक्टर लबाड होता. आम्ही नवी दिली स्टेशनला जायचे आहे सांगितल्यावर त्याने तिकिट दिले. पण दोन वेळा विचारल्यावर ' अभी दूर है ' सांगितले. शेवटी एका सहप्रवाशाला विचारले तेंव्हा नवी दिल्लीला ही बस जात नाही असे कळले. तोवर दुसरा प्रवासी सरसावला. बाबांनी रिक्शाने किती वेळ लागेल विचारल्यावर म्हणाला, चला माझ्याबरोबर! मी वाटेत उतरतो. आमचाही नाईलाज होता. त्याला बरोबर घेतले. त्या लबाडाने रिक्षा फिरवून आधी स्वतःचे स्थान गाठले आणि मग आम्ही दिल्ली टूरिझम. 'आपण पुणेकरांना उगाचच नावं ठेवतो.'  दिल्ली टूरिझमच्या २.०० ते ५.०० अशा आफ्टरनून टूरचे आम्ही बूकिंग केले होते. ट्रेनमधून योग्यवेळी उतरल्याने आणि वेळेवर दिल्लीसाठी बस मिळाल्याने आमची ती टूर चुकली नाही. या टूरमधे दिल्लीतील काही महत्वाची ठिकाणं आम्ही पाहिली. त्यातील पहिले ठिकाण ...


१. जामा मशीद


ही मशीद आतून इतर धर्मियांना पाहता येत नाही. तशी परवानगी नाही. दिल्ली टूरिझमच्या गाइडने देखील आम्हाला ही मशीद बाहेरूनच दाखवली आणि माहिती पुरवली.


ही मशीद १६५६ मध्ये बांधली गेली. याच्या आवाराची व्याप्ती २०,००० लोकांना एकाच वेळी सामावण्याची आहे. मुघलसम्राट शहाजहानने जामा मशीदीची स्थापना केली. ही त्याने स्वतःसाठी बांधली होती आणि लोक हिला ' मस्जिद-इ-जहनुमा' असे म्हणत असत. ' जहान म्हणजे जग आणि नुमा म्हणजे स्पष्ट.


हिचे बांधकाम १६५० मध्ये सुरू झाले आणि ते पूर्ण होण्यास ६ वर्षे व ५००० हून अधिक कामगार लागले. ही भारतातील सर्वात भव्य मशीद आहे. यास ३ मुख्य दरवाजे आहेत. इस्लामिक वास्तुशास्त्राचे हे एक उत्तम उदाहरण आहे. बांधकाम नमुनेदार मुघलशैलीत आहे. ही मशीद लाल किल्ल्याच्या बरोबर समोर आहे.


२. घंटेवालाचे दुकान


जमा  मशीदीजवळच हे जुने प्रसिद्ध मिठाईचे दुकान आहे. याची स्थापना १७९० मध्ये झाली. सोहनहलवा, काजूकतरी, लाडू ,पिनी अशा पदार्थांची रेलचेल येथे बघायला मिळते.तसेच मुघल काळाचा आस्वाद घेता येतो.


३.राजघाट


येथे म̱. गांधींची समाधी आहे. हे ठिकाण जनपथपासूनकि.मी. वर यमुना नदीच्या तीरी वसलेले आहे. महात्मा गांधींचे अखेरचे शब्द ' हे राम ' एका चौकोनी काळ्या रंगाच्या ग्रॅनाइट दगडावर कोरले आहेत. दर शुक्रवारी आणि गांधींच्या पुण्यतिथीला येथे प्रार्थना केली जाते. येथील प्रशस्त बागा शांततामय वातावरण निर्माण करतात. येथे एक अखंड ज्योत तेवत आहे. एकंदरीतच दिल्लीतील अनेक बड्या नेत्यांची समाधी स्थळे येथे आहेत. असे सांगतात की चौधरी चरणसिंह यांच्या दहनाच्या वेळी राजघाटावर जागा दिली नाही. मग तिथेच थोडे पुढे ' किसानघाट' येथे त्यांची समाधी आहे.


४. इंडिया गेट ( दिल्ली की शान )


ही एक भव्य, विशाल दगडी कमानीची शिल्पकृती आहे. ' एडविन ल्युटनिस' ने या शिल्पाची रचना केली. या शिल्पकृतीस ऑल इंडिया वॉर मेमोरियल असे म्हटले जात असे. भारतीय जवानांनी पहिल्या महायुद्धात आपले प्राण गमावले त्या ८०,००० शहीदांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आले आहे.


लाल दगडापासून बनलेल्या ४२ मी. उंचीच्या कमानीवर दोन्ही बाजूस ' इंडिया' असे इंग्रजीत कोरले आहे. या कमानीवर ७०,००० पेक्षा अधिक शहीद जवानांची नावे कोरण्यात आली आहेत.


इंडिया गेटची पायाभरणी १९२१ मध्ये नवी दिल्लीतील राजपथ येथे करण्यात आली आणि याचे बांधकाम १९३१ मध्ये पूर्ण झाले.


स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या संरक्षणासाठी बलिदान केलेल्या सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तिथेच अमर जवान ज्योती स्मारक उभारण्यात आले. एका चौथऱ्यावर एक उभी बंदूक, त्यावर हेल्मेट ठेवण्यात आली आहे. बाजूला अखंड ज्योत तेवत असते.


त्या स्मारकासमोर उभे राहून नतमस्तक होताना ऊर दाटून येतो. रात्रीच्या अंधारात, दिव्यांच्या रोषणाईत न्हायलेले 'इंडिया गेट' काही औरच भासते.  


 ५.  लाल किल्ला     


मोगल कालखंडात भारतात ज्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तू उभारण्यात आल्याचे सांगतात त्यांपैकी एक म्हणजे ' दिल्लीचा लाल किल्ला '.


एकेकाळी हिंदुस्तानच्या बहुतांश भागावर हुकुमत गाजवणा-या सत्तेचे केंद्र. बादशहा शहाजहानने हा किल्ला त्याच्या कारकीर्दीत बांधला. त्याने आपली राजधानी ' शहाजहानबादला ' हालवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या हुकुमावरून हे शहर वसविण्यात आले. तटबंदीच्या आत वसलेल्या या शाहजहानाबाद शहराच्या पूर्वेकडील टोकास बांधण्यात आला ' जगप्रसिद्ध लाल किल्ला ' .   'गर फिरदौस बर रूए जमीस्त,   हमीस्तो  हमीस्तो हमीस्त '


"स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो इथे आहे, इथे आहे, इथे आहे" असे आमीर खुश्रोने या परिसराचे वर्णन केले आहे. (हे वाक्य तुम्हाला अनेक ठिकाणच्या वर्णनाकरता वापरलेले ऐकायला मिळेल.) दिल्लीचा लाल किल्ला हा लाल रंगाच्या दगडात बांधण्यात आला. किल्ल्याची भव्य तटबंदी, तटबंदीभोवती मोठा खंदक आणि एका बाजूला यमुना नदीच्या पात्राचा नैसर्गिक खंदक यांची संरक्षणाच्या द्रुष्टीने रचना करण्यात आली. १२० एकराचा हा परिसर आहे. किल्ला उभारताना त्यात कोणतीही उणीव राहू नये याची काळजी घेण्यात आली. हा उभारणीचा कालखंड मोगली सल्तनतीचा सुवर्णकाळ होता.


किल्ल्याच्या एक बुरूजावरून यमुना नदीतील पाणी वर उचलून घेऊन ते संपूर्ण किल्ल्यात खेळवायचे, ते पाणी कधी संगमरवरी पाटांच्या मधून न्यायचे, तर कधी कारंज्यांमधून थुईथुई थुईथुई नाचवायचे !!!    सगळेच थक्क करणारे !!!


या खास महाल परिसरात तोश खाना, ख्वाबगाह, तसबिह खाना आदींचा समावेश आहे. दिवाण-इ-खास हि एक अजून महत्वाची वास्तू. याच दालनात रत्नजडित असे मयूर सिंहासन होते, नादीरशाहने आपल्या स्वारीत इराणला पळवून नेले. दिवाण-इ-खास लगतच काही अंतरावर हमामखाना आहे. यात गरम, थंड पाण्याची सोय असे. गुलाबपाण्याचा वापरही बादशाही आमदानीत सर्रास करत. हमामखान्यालगत एका मशीद उभी आहे, ती    'मोतीमशीद '. ही मशीद औरंगजेबाने १६५९-६० या काळात बांधली. ती केवळ बादशहाच्या खाजगी वापरासाठी असे.


या वास्तूंच्या जोडीला अन्य वास्तूंचीही नंतरच्या काळात भर पडली. १८५७ या स्वातंत्र्य संग्रामात अखेरचा बादशाहा बहादूरशहा याचे वास्तव्य दिल्लीच्या या किल्ल्यात होते. त्याने येथे मोतीमहाल, हिरामहाल, जाफरमहाल यांची उभारणी केली. एकंदरीत दिल्लीचा लाल किल्ला वास्तुरचनेच्या बाबतीत भरपूर माहिती देणारा, खूप काही शिकवणारा आहे.


लाल किल्ल्याच्या भिंतीची उंची १०० फूट (३० मी.) आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी २ दरवाजे आहेत. एक लाहोर दरवाजा. या दरवाज्याचे मुख साधारणपणे लाहोरच्या दिशेने आहे. दुसरा म्हणजे दिल्ली दरवाजा.


लाहोर दरवाज्यावरच तिरंगा फडकत असतो.


६. जंतर मंतर ( नवी दिल्ली )


भव्य लाल किल्ला आणि त्याचा रंजक, मौल्यवान इतिहास मनात घोळत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. या प्रवासात आम्हाला इतर ठिकाणे बघायची होती जशी जंतर-मंतर, बिर्ला मंदिर वगैरे .


जंतर-मंतर ही विटा,दगड,चुना यांपासून बनवलेली विशाल ज्योतीषयंत्राची वेधशाळा आहे. जयपूरचे महाराज जयसिंह द्वितीय ( इ.स.१६९९-१७४३ ) यांनी मुघल सम्राट मुहम्मद शहा यांच्या आदेशावरून अंदाजे १७२४ मध्ये बांधली. महाराज जयसिंह हे ज्योतिषशास्त्रातील पंडित होते. हे निर्माण करण्यापूर्वी त्यांनी पाश्च्यात्य तसेच पौर्वात्य ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला होता. दिल्लीनंतर त्यांनी जयपूर, मथुरा, वाराणसी, उज्जैन येथे देखील जंतर-मंतरची स्थापना केली.


मथुरा येथील वेधशाळा मात्र आता नष्ट झाली आहे. या यंत्रानुसार ग्रहतारे यांचे अध्ययन केले जात असे तसेच ज्योतिषशास्त्राची काल गणना देखील केली जात असे.  


क्रमशः