'बेडी' चे परिशिष्ठ

बंदिगृहात शिक्षा म्हणून घातलेली बेडी साफ़च कां करावी, म्हणून पुष्कळ जण वैतागून बंदी बेडी साफ़ करणे सोडून देतात आणि शिक्षेच्या बेडी चे लालनपालन केले नाही, साफ़ केली नाही म्हणून बंदिपालाकडून दुसरी शिक्षा खावी लागते. त्यावाचून शेवटी साफ़ न केलेली बेडी गंजून स्वतःच्या पायाला अधिकच रुपु लागते म्हणजे शत्रूने दिलेल्या एकपट शिक्षेस नीट कुरवाळून घेतली नाही तर स्वतःस चौपट शिक्षा स्वतःकरवी देऊन घ्यावी लागते. म्हणून शेवटी शिक्षेच्या बेडी लाच एखाद्या अलंकाराप्रमाणे घासून पुसून झक्क ठेवणे भाग पडते. या विरोधाभासा वरुन अर्थातच या जगाच्या 'इच्छेच्या' पायातील त्या मूळ बेडीची त्या 'विधीनिषेधीय बेडीची' धर्माधर्माची आठवण होई. ही लोखंडी बेडी त्या मूळ बेडीची  केवळ एक अंशिक कडी आहे. ती धर्माधर्माच्या बेडीची इच्छास्वातंत्र्यास झालेली शिक्षा ही अशाच कारणास्तव कुरवाळत बसावी लागते. ती विधी निषेधांची बेडीही उलट पुसून ठेवावी लागतें नाहीतर अधिकच दुःख होते. या विचारपरंपरेच्या ओघानेच पुढील प्रश्न उठतो. याविधिनिषेधां ची मूळ शृंखला कोणी घडली? इच्छेच्या पायात ती कुणी घातली तें कुणी सांगावे !  विधिनिषेधां च्या शृंखला ज्यानी घडल्या त्यांच्या इच्छेने त्या धर्माधर्माच्या बेड्या आमच्या मानवी इच्छेच्या पायात घातल्या असतील किंवा त्यांच्या त्या इच्छेच्या पायातही आणखी एखादी इच्छाबेडी होऊन पडली नसेल कशावरुन ?


की जिच्यायोगे निसर्गनियमांच्या बेडीने जखडलेल्या त्यांच्या इच्छेला आमच्या इच्छेच्या पायात  ही विधिनिषेधांची बेडी अडकवणे भाग पडले ?असे हे बंदिगृहात उठणारे विचारतरंग या कवितेत गोवले आहेत.


 


स्त्रोत<समग्र सावरकर<काव्य विभाग<१८५