तारकांस पाहून -२

हे चांदणि ! सुखशीतल गमसी तशीच असशीना


आगचि* लागो लोळ आगिचा तुजसि वद त्याना


विमल विरल मेघांची दुलई ओढुनि निजलीसे


अशा अप्सरेच्या अनावृत्त वदनासम विलसे


आल्हादक किती चंद्रबिंब हे नंदसुधा झरते


फ़ुटो भिंग@ते भिकार त्या जे मसणासम करते


चंद्र चांदण्या असेच अंतर मापुनि देवाने


खचल्या नभि नि नयनीं काचा सुललित बेताने


त्यांचे रिझवो रुप जना कि  आल्हादक कोळे


फ़ुटोत ते त्या विद्रुप करिते दुर्बिणीचे डोळे


 


* ह्या चिमुकल्या चांदण्या नसून हे मोठे ज्वालागोल, आगीचे डोंब आहेत असे जे ज्योतिषशास्त्रज्ञ सांगतात त्यांच्या त्या शोधाला आग लागो.


@दुर्बिणीचे भिंग -कारण दुर्बिणीने चंद्र हा एक ओसाड, रुक्ष नि निर्जीव उपग्रह आहे असे दिसते


स्त्रोत <समग्र सावरकर<काव्य विभाग


 


===============================


 नवीन शोधांमुळे दुर्बिणीतून पाहिल्याने चंद्र हा ओसाड, रुक्ष नि निर्जीव वाटतो तो तसा वाटू नये व  अप्सरेच्या अनावृत्त वदनासम भासत राहो असं सुचवताना


चंद्र चांदण्या असेच अंतर मापुनि देवाने


खचल्या नभि नि नयनीं काचा सुललित बेताने


या ओळी सुरेख व गहिऱ्या अर्थाने भरल्या आहेतसे जाणवते.चंद्र आल्हाददायक वाटो हे सांगताना चंद्र हा एक ओसाड, रुक्ष नि निर्जीव उपग्रह आहे असे दाखवणाऱ्या दुर्बिणीचे डोळे फ़ुटो याचा अर्थ चंद्र रुक्ष व ओसाड न वाटो


यासाठी डोळे फ़ुटो इतकाच.(विज्ञाननिष्ठ सावरकर असे कसे म्हणतात असा प्रश्न न येवो मनी अशी अपेक्षा!)


 


चंद्र परांजपे