मद्याचा पेला...!
शुद्धीचे काहीच नको तू बोलू या खेपाला।
भर सये तू नकोस थांबू मद्याचा पेला ॥
कळते अवघे प्रश्नच सारे,
बेमालूम उत्तरे गं ऽऽ
कळपासंगे कापायची
आपापली अंतरे गं ऽऽ
थांबला तो संपला ना थांबे तोही गेला,
भर सये तू नकोस थांबू मद्याचा पेला ॥
जडावली जिव्हा पेलून,
सत्याचे वजन गं ऽऽ
वाणीही घसरली, बोलता;
मेंदू आणि मन गं ऽऽ
आज वदू दे मनातले मज, त्यागून चिंतेला
भर सये तू नकोस थांबू मद्याचा पेला ॥
अंतरातून खोल कुठुनशी
'ती' आली माझ्या भवती गं ऽऽ
अजून उमगते भासच हा,
पुन्हा डोळे द्रवती गं ऽऽ
वास्तवाचा गाव अजून ही कल्पनेत ना गेला,
भर सये तू नकोस थांबू मद्याचा पेला ॥
अताच कुठे सारे काही,
मला 'एकसे' वाटे गं ऽऽ
'तो' खरा अन् तू ही मी ही
उमगे सारे खोटे गं ऽऽ
सारे पळती नसलेल्या स्थळी, सलाम ईश-सत्तेला,
भर सये तू नकोस थांबू मद्याचा पेला ॥
पहा वाढले आताशा कुठे,
हृदयाचे या ठोके गं ऽऽ
पाय बिथरले पहा घेतसी
वाऱ्यासंगे झोके गं ऽऽ
विचार तरीही अजून चालती, ना तोल तयांचा गेला;
भर सये तू नकोस थांबू मद्याचा पेला ॥
योग्यायोग्य नाही काही,
सत्यासत्यही नाही गं ऽऽ
योग्य, सत्य अन् क्षेम सारे
श्वास जोवरी वाहे गं ऽऽ
अता सोसेना काही मला, मी स्वाधीन झोपेला,
भर सये तू नकोस थांबू मद्याचा पेला ॥