कथिती ज्योतिषी तसे आगिचे लोळ कुणी तारे
असतिल दुसरे, नव्हेत हे, हे अमृत-बिंदु सारे!
कीं जै असुरां-सुरांमध्ये क्षीराब्धि-मंथनकाली
अमृत-कलश वरि येता ओढाताण सबळ झाली
ओढाताणित इतस्ततः त्या अमृत-बिंदु गळले
तयांचि तारे म्हणुनि ज्योतिषि भले भले चकले
कीं बघोनि अप्सरो-गणेंही वसुधेवरि खाली
चमेलि, जाई, जुई, मोगरा, मालतिही फ़ुलली
त्यांच्या नंदनवनिंही असावि ऐशीं काम्य फ़ुलें
यास्तव पेरुनि देती अप्सरा हास्य नभीं अपुले
हास्य-लते सुरसुहासिनींच्या आलीं ऋतुंत फ़ुले
तयांचि तारे म्हणुनि ज्योतिषि भले भले चकले
सुनील शालूवरि मायेच्या* लकलकती टिकले
तयांचि तारे म्हणुनि ज्योतिषि भले भले चकले
सुवर्ण-गौरा-गौरी श्रीहर लीलारत झाले
थाप पडे तों द्वारीं श्रीहरि भेटाया आले
नग्ना लगबग गिरिजा धावे सावरु शालूला
हिसका बसुनि हार गळ्यातिल तटकन् तो तुटला
त्या हारातिल मोती सैरावैरा ओघळले
तयांचि तारे म्हणुनि ज्योतिषि भले भले चकले
दशानने पळवूनि जानकी नभःपथे नेली
अश्रुबिंदु जे देवी टपटप ढाळित त्या काली
तेचि राहिले असे चकाकत जाणो दिव्यबलें
तयांचि तारे म्हणुनि ज्योतिषि भले भले चकले
नरकपतीचा हल्ला आला चितोडनगराला
देवांनाही स्वर्गिं जलदीने वर्दि द्यायाला
सिद्धाग्नितुनि फ़र्कन ज्वाला-लोळ नभीं उठती !
चितोडवासिनी देवि तो त्यावरि आरुढति
ज्वालारुढा देवि दुरुनि त्या चमकति तेजोबळें
तयांचि तारे म्हणुनि ज्योतिषि भले भले चकले
स्त्रोत<समग्र सावरकर<काव्य विभाग<१९०६