आकाशाच्या ग्रंथ-संग्रहालयासि अर्पियला
कालें*ग्रंथ प्रचंड विश्वेतिहास जो लिहला
रौप्यमुद्रांकित तद्भागा अनुक्रमे रचिलें
तयांचि तारे म्हणुनि ज्योतिषी भले भले चकले
प्रभु विरचित नवनाटक मायाविजय जगद्रंगी
अभिनयिले जाताच सुरांच्या प्रेक्षक अर्धांगी
नाट्यालयिच्या नभातल्या या सज्जातुनि साऱ्या
चमकत चमकत डोकावूनि जैं बघत्या झाल्या
वदनमंडले देवींची त्या लुकलुकता भुलले
तयांचि तारे म्हणुनि ज्योतिषी भले भले चकले
कामव्याकुल शंभु लागला भिल्लिणिचे पाठी
पुराणींच ही कथा, कथिनचि मी कुठली खोटी
नाचत निसटे माया भिल्लिण तोहि तिजमागे
कामव्याकुल, आकाशाच्या अंगणात लागें
टपकत संचितवीर्य प्रभुचे बिंदु बिंदु गेले
तयांचि तारे म्हणुनि ज्योतिषी भले भले चकले