राजशिष्टाचार : प्रमोद नवलकर (म.टा.)

श्री प्रमोद नवलकर पूर्वी प्रोटोकॉल मंत्री होते. त्यांनी म. टा. मध्ये लिहिलेला एक अतिशय खुसखुशीत लेख. मराठीतून आस्वाद घेता यावा ह्या उद्देशाने येथे उतरवून ठेवला आहे.

राजशिष्टाचार
ले. प्रमोद नवलकर
महाराष्ट्र टाईम्समधील मूळ लेख येथे आहे. : राजशिष्टाचार
[ , १६, ऑग. २००४ सायं ०४:५३:०५ ]

अथेन्समध्ये ऑलिम्पिक स्पर्धा चालू असल्याने सध्या तोच विषय चर्चेत आहे. अंजली भागवतचा फोटो वर्तमानपत्रात पहिल्या पानावर झळकला. त्यांना कोणतं तरी पदक मिळालं असावं या आशेने मी ती बातमी वाचली आणि माझी निराशा झाली. कारण सुनील दत्त यांचा अथेन्समध्ये अपमान झाला म्हणून त्यांनी तिथल्या पत्रकारांना मुलाखती दिल्या होत्या. अथेन्समध्ये गेल्यावर त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना व्ही.व्ही.व्ही.आय.पी. वागणूक मिळाली नाही म्हणून ते नाराज होते. आपला अपमान हा संपूर्ण देशाचा अपमान आहे असं वाटल्यावरून सुनीलजींनी त्यांची गैरसोय जगाच्या वेशीवर टांगली. सुनील दत्त यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचं बुकिंग दूरवरच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आलं होतं. त्यांना व्ही.व्ही.व्ही.आय.पी. पास मिळाला नव्हता. त्यांच्या स्वागतासाठी कोणीही राजदूत हजर नव्हता. तसं व्हायला नको होतं. पण झालं त्याचा दोष तिथल्या संयोजकांना देण्यापेक्षा आपणही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

[float=font:shital;size:20;breadth:200;place:top;]आपल्या देशातले सर्व मंत्री म्हणजे लाडावलेली बाळं आहेत. इतके त्यांचे लाड होतात की उद्या बुशना कोणी आपण अमेरिकेचे राष्ट्रपती राहू इच्छिता असं विचारलं तर बुश कदाचित महाराष्ट्राचे राज्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करतील.[/float] काम कमी आणि भरपूर सवलती असं जगातलं एकमेव पद म्हणजे भारतातले मंत्री. त्यांच्यासाठी असलेला 'प्रोटोकॉल' नावाचा जो प्रकार आहे तो जेवढा खर्चिक तेवढाच प्रशासनाला डोकेदुखीचा असतो. युतीच्या राजवटीत मी प्रोटोकॉल मंत्री असल्याने मला त्याचे अनेक धक्कादायक प्रकार माहीत आहेत.

गोपनीयतेची शपथ घेतल्याने सगळंच काही उघड करता येत नाही. पण तरीही सांगण्यासारखं खूप आहेत. मंत्र्यांच्या गाडीवरच्या दिव्यापासून ते सर्किट हाऊसवरच्या सलामीपर्यंत राजशिष्टाचारात अंतर्भूत असलेल्या अनेक गोष्टी कुपोषण आणि दुष्काळापेक्षा अधिक महत्त्वाच्या मानल्या जातात. महाराष्ट्रातल्या सगळ्या सर्किट हाऊसच्या बाहेर कोपर्‍यात दहाबारा बंदुकधारी पोलिसांचा एक तंबू, मंत्री असो अगर नसो, ३६५ दिवस चोवीस तास तळ ठोकून असतो. कधीतरी केव्हातरी मंत्र्यांचं आगमन होताच त्याला बंदूकी उगारून आणि बिगुलच्या निनादात सलामी दिली जाते. जर एखाद वेळेस बिगुल वाजला नाही तर मंत्र्यांचा तो घोर अपमान होतो. केवळ आगमन प्रसंगीच नव्हे तर जातानादेखील सलामी आवश्यक असल्याने पोलिस टॉयलेटला गेले असतील तर मंत्री सलामीसाठी पायरीवर थांबतात.

इतर राज्यांतून, दिल्लीहून आणि परदेशातून येणारे मंत्री या स्वागताने अक्षरश भारावून जातात. पंतप्रधान आणि उपपंतप्रधानांच्या स्वागतासाठी तर विमानतळावर ३६ गाड्या स्टॅण्डबाय ठेवल्या जातात. ते राजभवनपर्यंत पोहोचेपर्यंत वाहतूक बंद ठेऊन दुतर्फा सहाशे पोलिस तासन्तास उभे राहतात. सुसज्ज सह्याद्री गेस्ट हाऊस झाले असतानाही दिल्लीच्या अतिथी मंत्र्यांना ताज किंवा ओबेरॉयमध्ये 'सूट' पाहिजे असतो. उपाध्यक्ष नजमा हेतपुल्ला येणार असतील तर माझी झोप उडायची. कारण त्यांच्या गाडीत हॉर्न वगळल्यास इतर कोणताही आवाज आला तर गाडी बदलून द्यावी लागे. एरवीदेखील आपल्या देशातल्या मंत्र्यांच्या सवलती आणि ठेवली जाणारी बडदास्त याची त्यांना एवढी सवय लागली आहे की लाल गालिचा सोडून चुकून जमिनीवर पाय पडला तर पायाला दगड टोचतात. वसंतराव नाईकांच्या कारकिर्दीतली एक घटना मला आठवते. शिक्षणमंत्र्यांच्या मलबार हिलवरच्या बंगल्यातलं गुलाब चोरीला गेलं म्हणून गावदेवीच्या इन्स्पेक्टरची बदली झाली. मंत्र्यांच्या या रुबाबामुळे सगळे पोलिस त्यांना जाम टरकतात, पण सॅल्युट ठोकताना मनातल्या मनात शिव्या हासडतात.

मंत्र्यांच्या बंगल्याचं वर्णन करण्यासाठी एक स्वतंत्र लेखमालाच लिहावी लागेल. भिंती वगळता त्यांना सर्वकाही बदलून पाहिजे असतं. दीड एकरमध्ये असलेल्या माझ्या विशाल बंगल्याला दोन मजले होते. पहिला मजला मी एकदाच पाहिला. दुसरा कसा होता हे मला कळलंच नाही. पूर्वी कुठेतरी एक छान प्रस्ताव आणला होता. मंत्रालयाच्या समोर असलेल्या दहा एकर जागेत राज्यमंत्र्यांचे बंगले आहेत. ते सगळे पाडून तिथे मंत्र्यांसाठी आणि राज्यमंत्र्यांसाठी दोन टॉवर उभे करून मंत्र्यांचे सगळे बंगले विकून टाकायचे. म्हणजे त्यावर्षी महाराष्ट्रातल्या अर्थसंकल्पात कर लादण्याऐवजी बर्‍याच सवलती देता येतील.

परदेशातल्या मंत्र्यांचा एक अनुभव सांगण्यासारखा आहे. मॉरिशसच्या वरिष्ठ मंत्री शीलाबाय बापू आपल्या देशात लोकप्रिय होत्या. त्यांच्या निमंत्रणावरून मी मॉरिशसला त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांचा बंगलाच सापडेना. गर्द झाडीतल्या छोट्या पायवाटेने जात असताना एकाने झाडीत दडलेल्या त्यांच्या बंगल्याकडे बोट दाखवलं. दारावरची त्यांची पाटी वाचून मी बेल दाबली. गंजीफॉक आणि तोकडी खाकी पॅण्ट घातलेल्या एका सेवकाने दार उघडलं. छोट्याशा दिवाणखान्यात मी बसलो. सातआठ मिनिटांनी शीलाबाई नाइट ड्रेसमध्येच बाहेर आल्या आणि मला पाहून आश्चर्यचकीत झाल्या. दोन मिनिटांत कपडे बदलून त्या बाहेर आल्या आणि 'चहा घेणार का?' असं विचारलं. मी 'होय' म्हणताच शीलाबाय पुन्हा तत्परतेने आत गेल्या आणि दहा मिनिटांनी स्वत केलेला चहाचा ट्रे घेऊन बाहेर आल्या. ते सर्व वातावरण पाहून मला चुकचुकल्यासारखं वाटलं. कोपर्‍यातल्या डायनिंग टेबलवर बसलो असताना शीलाबाईंनी त्यांच्या यजमानांना चहा घ्यायला बोलावलं. यजमान बाहेर आले आणि मला जबरदस्त धक्का बसला. कारण बेल दाबल्यावर त्यांनीच दरवाजा उघडला होता. त्यानंतर शीलाबाईंनी लगेच त्यांच्या गाडीतून एका लग्नाला नेलं. तिथे सर्वांच्यासमवेत आम्ही भोजन केलं. नंतर कोणाच्यातरी घरी गणपती दर्शनाला गेलो. तिथे चाललेल्या आरतीत मागे उभे राहून सहभागी झालो, पण कोणी मागे वळूनदेखील पाहिलं नाही. मॉरिशसच्या त्या छोट्या दौर्‍यात माझ्या आठवणीत काय राहिलं असेल तर शीलाबाईंचा चहा आणि दरवाजा उघडणारे त्यांचे यजमान!

प्रमोद नवलकर