पंखांना आकाश दिसावे...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक विधान अतिशय प्रसिद्ध आहे. "गुलामांना त्यांच्या गुलामगिरीची जाणिव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील" आपण सर्वांनी हे विधान बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आणि वाचलेलं आहे.पण या विधनातील मर्म मात्र अजून बऱ्याच  लोकांना कळलेलं दिसत नाही. कदाचित 'अतिपरिचयद् अवज्ञा' अशी या विधानाची गती झाली असावी.


हिंदू धर्मातील महार या जातीने बाबासाहेबांच्या या विधानाची किंमत जाणली अन् आज तो समाज सर्व अंगांनी फुलत फळत आहे. इतरांनी मात्र या विधानाकडे हवे तितके लक्षच दिले नाही. अजुनही हिंदु धर्मात शुद्राच्या पायरीवर उभा असलेला मराठा, कुणबी, तेली, माळी, कुंभार, सुतार, लोहार ई.ई. समाज त्या पायरीवर उभा राहण्यातच धन्यता मानत आहे.किंबहुना आपण या पायरीवर उभे आहोत हेच त्यांना माहित नाही. हिंदू म्हणवण्यातच ते स्वतःची धन्यता मानतात.


यापार्श्वभूमीवर शिवधर्माच्या उदयाने समाजात बरेच परिवर्तन घडून येत आहे. लोकांना हिंदू वैदिक धर्मात त्यांचे नेमके स्थान काय आहे ते कळायला लागले आहे. लोक हळूहळू जागे होत आहेत, पण समाजप्रबोधनाची ही गती पुरेशी मात्र नाही. प्रसारमाध्यमे अजुनही जागी झालेली नाहीत आणि ती जोपर्यंत त्यांच्या ताब्यात आहेत तोपर्यंत ती जागी होणारही नाहीत. मराठामार्ग, जिजाऊ संदेश, बळीराज धोटे यांचे भुमीपुत्राची हाक ही काही नियतकालिके आहेत पण त्यांचा वाचकवर्ग ठाराविक आहे हेसुद्धा नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर मा.प्रकाश पोहरे यांचे दै.देशोन्नती महत्त्वाची भुमीका पार पाडत आहे.


शेवटी महत्वाचा मुद्दा हा आहे की लोकांनी त्यांच्या डोक्यांनी विचार करावा अन् त्यांना तो विचार करायला कुणीतरी उद्युक्त करावं. मराठा सेवा संघ, भारतीय सत्यशोधक समाज हे काम अतिशय समर्पित भावनेनं, पोटतिडकीनं करत आहेत. पण तेवढ्यानं आता भागणार नाही. स्वतःच्या स्वाभिमानाचा हा विचार प्रत्येकाच्या मनात पेटायला हवा. पिंजऱ्याला चिकटलेल्या पाखरांना आपल्या पंखांची जाणिव व्हावी, पिंजऱ्याबाहेर अनंत आकाश आपली वाट पाहत आहे.