मीलन

मीलन


आज सकाळचा सूर्य काही वेगळेच रंग घेऊन उगवला होता
ढगांच्या मागे लपत छपत
आपल्या रंगांची पखरण थोडासा हात राखूनच करत होता
त्याच्या अंतरातलं काय गुपित होतं......
जे तो उघडू पहात नव्हता
दिवस पुढे जाता जात नव्हता
पण आता मात्र ढगांना अचानक
चंदेरी किनार फुलू लागली होती
सूर्य जरा धसमुसळेपणानंच आपल्या किरणांना धाडू पहात होता
कशासाठी....... ?
ढगांचाही मग नाइलाजच झाला
इवल्या इवल्या जागेतूनही किरणं शिड्या घेऊन अलगद उतरली
आणि धरतीवर हळुवार विसावली
जणूकाही आपल्या प्रियतमेसाठी त्याने अंथरलेला पापण्यांचा गालिचा
ढगही श्वास रोखून वाट बघत होते
कोण असेल ती........?
सूर्याचे रंग अधिकच गहिरे होऊ लागले
शेवटी त्याने आपले नाजूक अस्त्र उपसले
इंद्रधनुषी वेष धारण केला अन् किरणांच्या रथावर स्वार झाला
आता मात्र तिला राहवेना
त्याची तगमग बघवेना
हिरवागार शालू.....
नुकतेच न्हाऊन मोकळे सोडलेले केस...
त्यावरचे राहिलेले जलबिंदू.. .. ..
गालावर आपसूक आलेली लाली
पायाच्या अंगठ्यावर खिळलेली नजर
नजरेतील सलज्ज भाव.. ..
तो पुरता वेडा झाला
किती हा उशीर...... असं म्हणायलाही विसरला
फक्त आपले विशाल बाहू पसरले.......... अन् तीही त्यात सामावली
त्या आश्वासक मिठीत स्वत:लाही विसरली
दूर कोणीतरी सांगत होतं.. .. .. ..
' ते क्षितिज..... जिथे सूर्य धरतीला भेटतो... आभाळाच्या साक्षीनं'.


जयश्री