यंत्रयुगाची सुरुवात

शाळेत असतांना मला एक मोठं कुतुहल वाटायचं. आमच्या छोट्याशा गांवांतले कांही यंत्रमाग, छपाईयंत्रे, पिठाच्या गिरण्या वगैरे धडधड आवाज करणारी कांही यंत्रे मी तौंडाचा आ वासून पाहिली होती. जवळच्या भागातील कापडाच्या गिरण्या, साखरकारखाने वगैरेबद्दल ऐकले होते. तिथल्या मोठाल्या यंत्रांमध्ये एका बाजूला कापूस किंवा ऊस घातला की दुस-या बाजूने आपोआप कापड किंवा साखर बाहेर पडते अशी माझी भोळसट समजूत होती. ही असली अवजड यंत्रे बनवणारे मोठमोठे कारखाने असतात असंही ऐकलं होतं. त्या कारखान्यातली यंत्रे आणखी कोठे तरी बनत असतील, पण तिथली यंत्रे कशा प्रकारची असतील व ती कोण बनवत असेल हे कोडं कांही सुटत नव्हतं. 


इंजिनिअरिंगला गेल्यावर त्याचा थोडाफार उलगडा झाला. अशा प्रकारचे कांही कारखानेसुध्दा प्रत्यक्ष पाहिले. पण मनांत एक नवीन कोडे उगवले. आज दिसणारी यंत्रे फार फार तर शे दोनशे वर्षापूर्वी अस्तित्वात आली असतील. पण ती बनण्यापूर्वी जगातली अगदी पहिली यंत्रे कशी बनली असतील? या प्रश्नाचे सुसंगत उत्तर मिळायला बराच काळ लागला. ब-याच अवांतर अभ्यासानंतर लक्षांत आले की हा प्रवास कांही शेकडो नव्हे तर कित्येक हजारो वर्षांपूर्वी सुरू झाला होता.


अगदी आदिमानवाच्या काळापासून मनुष्य हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा वागत आला आहे. इतर पशुपक्षी फक्त आपापली शिंगे, नखे, चोच वगैरेचा लढण्यासाठी उपयोग करतात तर मनुष्यप्राणी लाकडाचे दांडके, काटेरी फांदी, मोठे हाड, दगड असा हत्यारांचा उपयोग स्वसंरक्षणासाठी तसेच आक्रमण करण्यासाठी करू लागला. तसेच झाडांची फळे, पाने तोडणे, मुळांसाठी जमीन खणणे अशा कामासाठी त्यांचा उपयोग करू लागला. त्यांत सतत सुधारणा होत गेली. कालांतराने अग्नीवर नियंत्रण करता आले, विविध धातूंचे उत्पादन करून त्यांना मनासारखे वेगवेगळे आकार देता येऊ लागले. यातून पुराणकाळातील गदा, त्रिशूल, धनुष्यबाण व इतिहासकाळातील तलवारी, भाले, बरच्या तयार झाल्या. पुढे तोफा, बंदुका आल्या. दुस-या बाजूला कु-हाडी, फावडी, कुदळी, पहारी यासारखी अनेक अवजारे तयार होऊन उपयोगात आली. माणसाने वनस्पति व इतर प्राण्यांवर ताबा मिळवून शेती सुरू केली व तो एका जागी घर बांधून राहू लागला.


चक्राचे महत्व समजल्यावर त्याचा गाडीची चाके, जाते, रवी, रहाटगाडगे इत्यादि अनेक प्रकारे वापर सुरू झाला. कुंभाराचे चाक, तेलाची घाणी किंवा पाण्याचा रहाट यांना आद्य उत्पादक यंत्रे म्हणता येईल आणि  अर्थातच ती बनवण्यासाठी लागणारी सुतारकामाची औजारे ही आद्य मशीन टूल्स. या सर्वांचा विकास हजारो वर्षे होत गेला.  एखादी वस्तु गोल फिरवून तिला तीक्ष्ण हत्याराने कट देणे (लेथ) व तीक्ष्ण हत्यार एका जागी गोल फिरवून वस्तूला भोक पाडणे (ड्रिल) या प्रकारची यंत्रे प्रथम बनली. तरफ व पाचर यांचा चक्राबरोबर संयोग करून गिअर व स्क्रू बनवण्यात आले, यंत्रांच्या जडणघडणीत त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला. पूर्वीच्या यंत्रांतले अनेक भाग हस्तकौशल्यानेच बनत. सुरुवातीला ती अवजारे व यंत्रे फक्त हातानेच चालवीत, कांही यंत्रे पायाचा उपयोग करून चालवता येत तर कांही दोन किंवा अधिक माणसे मिळून चालवीत.


वाहतूक व कृषी यांमध्ये पाळीव प्राण्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होऊ लागला. तसेच मोठी यंत्रे ओढून फिरवण्यासाठी सुध्दा त्यांचा वापर सुरू झाला. पण या सर्वाला ठराविक मर्यादा होत्या कारण माणसे व प्राणी लवकर थकून जात. वाफेच्या इंजिनाचा शोध लागल्यावर यंत्रांमध्ये क्रांतिकारक बदल झाला. कारण आता एक न थकणारे साधन मिळाले व त्याची शक्ती अनेक पटीने वाढवता येणेही शक्य होते. यंत्रांची चाके फिरवण्यासाठी स्वयंचलित इंजिनांचा जसजसा उपयोग होऊ लागला तसतशी त्यानुसार अवाढव्य यंत्रे विकसित झाली व औद्योगिक क्रांती झाली. लीड्स येथील औद्योगिक प्रदर्शन पहातांना या सर्व प्रवासाच्या माहितीची उजळणी झालीच पण यातील बरेचसे टप्पे इंग्लंडमध्ये विकसित झालेले असल्यामुळे त्यातील कांही महत्वाचे दुवे प्रत्यक्ष जवळून पहायला मिळाले.