देव किती लवकर
पावत नवसाला...
एक दोन सत्यनारायण
होऊनच जात वर्षाला...
आला थोडासा
ताप वा खोकला
झालीच समजा
आम्हाला सर्दी
तरी
लगेचच जायची
देवांना वर्दी
आई सांगायची
कामं देवाना
आणि देवही लगेचच
लागत कामाला...
ते पळवून लावत
ताप आणि खोकला
आणि तिने सांगितले तर
घेऊनही येत पावसाला...
देव आणत स्थळं
ताईसाठी शोधून
आक्काचा पळणा
हलकेच देत जोजवून..हलवून
दोनचार देव तर
नेहमीच असत
तिच्या दिमतीला
ती सांगायची त्यांना, फक्त
तिचं कुंकू जपायला...
देवांशी तर तिची
थेट ओळखच असायची
रामा..̱गोविंदा... जगदंबा
असं सारखं पुकारायची
देवाच्या द्वारी ती
क्षणभर उभी राहात असे,
पण त्यासाठी तिला
बापू, दादा, अण्णांचा
टेक्य्य कधी लागत नसे!
ती कधी देवांना
वर्गणी देत नसे...
किंवा मासिकाच्या मेंबरशिपचे
तिला कधी टेन्शन नसायचे...
मन:शांतीसाठी तिने कोठला
'कोर्स' केला नाही,
देवांनीही तिला तसा
कधी 'फोर्स' केला नाही...
साधे भोळे होते
देव तिचे तसे
चार चौघात त्यांनी
होऊ दिले नाही हसे!
गरीब होते बिचारे
मुकाट फळीवर राहायचे,
संगमरवरी देव्हाऱ्याचे
स्वप्न त्यांनाही नाही पडायचे...
भाजी आणि भाकरीचा
नैवेद्य गोड मानून घ्यायचे,
एका सत्यनारायणाच्या
मोबदल्यात
देव आमच्या घरी
वर्षभर राबायचे
कवि : मनोहर विभांडिक
ही आणखी एक संग्रहित कविता